औषधाला दाद न देणाऱ्या क्षयरोगासाठी आखून दिलेली उपचारांची चौकट बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, या रुग्णांना वैयक्तिक गरजांनुसार औषधोपचार करण्यास मान्यता मिळाली आहे. मुंबईतील एक्सडीआर टीबी रुग्णांची नोंद वाढत असल्याने केंद्रीय गटाने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत मुंबई महापालिकेला विविध पातळ्यांवर मदत देऊ केली आहे. त्यात तपासणीसाठी पाच जीन एक्स्पर्ट यंत्र, शिवडी रुग्णालयात श्वसन अतिदक्षता विभाग तसेच रुग्णांना पोषक आहार अशा सुविधांचा यात समावेश आहे.
शहरात दरवर्षी सुमारे ३० हजार क्षयरोग रुग्णांची नोंद होते. गेल्या दोन वर्षांपासून औषधांना दाद देत नसलेल्या क्षयरोगाविषयी जागृती झाल्यावर व पालिकेने त्यासंबंधीच्या चाचण्या उपलब्ध करून दिल्यानंतर एमडीआर (मल्टी ड्रग रेझिस्टंट) तसेच त्या पुढच्या एक्सडीआर (एक्स्ट्रीमली ड्रग रेझिस्टंट) क्षयरोग रुग्णांची नोंद होऊ लागली. २०१२ मध्ये ३२, तर २०१३ मध्ये ९० रुग्णांना एक्सडीआर क्षयरोग झाल्याचे समोर आले. सामान्यत: क्षयरोगासाठी पाच टप्प्यात उपचार केले जातात. पहिल्या टप्प्यातील औषध लागू न पडल्यास पुढील टप्प्यातील औषधे द्यावी लागतात. त्यामुळे एक्सडीआरचे निदान होऊन पाचव्या टप्प्यातील औषधे सुरू करण्यासाठी किमान नऊ महिने ते वर्षांचा काळ जातो.
रुग्णांना दुसऱ्या टप्प्यातील औषधे सुरू करतानाच एक्सडीआरची चाचणी करावी व ती सकारात्मक आल्यास थेट पाचव्या टप्प्यातील उपचार सुरू करण्यास केंद्रीय गटाने मुंबई भेटीत तत्त्वत: मान्यता दिल्याचे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी सांगितले. तसेच या रुग्णांवर प्रभावी ठरणारी अ‍ॅण्टिबायोटिक्स वापरण्यासही मान्यता देण्यात आली आहे. एक्सडीआर क्षयरोग निश्चित करण्यासाठी तूर्तास केवळ हिंदुजा रुग्णालयाला मान्यता देण्यात आली असून त्याची चाचणी क्षमता ५०० रुग्णांची आहे. त्यामुळे महापालिका तसेच राज्य सरकारच्या जे जे रुग्णालयात प्रत्येकी एक हजार रुग्ण क्षमतेचे चाचणी केंद्र उभारावे लागणार आहे.
एमडीआर रुग्ण समजण्यासाठी पालिकेकडे सध्या दोन जीन एक्स्पर्ट यंत्र असून आणखी पाच यंत्र केंद्राकडून येणे अपेक्षित आहे. शिवडी रुग्णालयात श्वसनासंबंधी अतिदक्षता विभाग स्थापण्यासाठीही केंद्राने पुढाकार घेतला आहे. एक्सडीआर रुग्णांना औषधांसोबत पूरक पोषक घटकांची आवश्यकता असते. मुंबई परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या रुग्णांना रोज कशा पद्धतीने पोषक आहार देता येईल, त्याची योजना पालिकेकडून मागवण्यात आली असून १ जूनपासून ही योजनाही राबविण्यात येईल.