तंबाखू आणि सिगारेटला पर्याय म्हणून वापरण्यात येणाऱ्या निकोटिन च्युइंगमवरही अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई होणार आहे. कोटय़वधी नागरिकांच्या आरोग्यापेक्षा तंबाखूविक्रेत्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असे सांगत तंबाखूविक्रेत्यांनी संप पुकारला तरीही कारवाई सुरूच राहणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
सिगारेट सोडण्यासाठी निकोटिन च्युइंगम खाल्ले जाते. मात्र पानमसाला, गुटखा यांच्यावर बंदी आणल्यावर पर्याय म्हणूनही निकोटिन च्युइंगम चघळला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. तंबाखू, गुटखा, सुगंधित सुपारी तसेच सुगंधित तंबाखू यांच्यावर १९ जुलैपासून बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांच्या आरोग्याला घातक असलेल्या निकोटिन च्युइंगमवरही कारवाई करण्यात येईल, असे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी बुधवारी सांगितले.
गुरुवार, २२ ऑगस्टपासून तंबाखूविक्रेत्यांनी संप पुकारला आहे. ‘कायद्याने तंबाखूवर बंदी आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे, त्यामुळे कारवाई सुरूच राहील, असे झगडे म्हणाले.
गेल्या वर्षी १९ जुलैपासून तंबाखू, गुटखा, पानमसालावर आणलेली एक वर्षांची बंदी या वेळी पुन्हा एक वर्षांने वाढवण्यात आली. ही बंदी कायमस्वरूपी असावी यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उत्पादकांची यादीच नाही
गुटखा आणि तंबाखूच्या उत्पादनांवरही बंदी असली तरी राज्यातील उत्पादकांची एकत्रित माहितीच उपलब्ध नाही. त्यामुळे कारवाई करण्यावर मर्यादा येत आहेत.
रेल्वेकडून सहकार्याची अपेक्षा
राज्यात उत्पादन आणि विक्रीला बंदी असली तरी परराज्यातून रेल्वेमधून गुटखा, तंबाखूचा साठा येत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा माल अनेकदा शोधणे कठीण जाते. तसेच मुंबईत माल पकडण्यात आल्यावर अनेक सबबींखाली तो सोडवला जातो. याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाने रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून अशा मालावर बंदी घालण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.