मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) धर्तीवर राज्यात शाळांचे वेळापत्रक लागू केले जाणार असल्याची चर्चा गेले काही दिवस रंगली होती. या पार्श्वभूमीवर भौगोलिक परिस्थिती आणि हवामानानुसारच शाळांचे वेळापत्रक निश्चित केले जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी विधानसभेत दिली. त्यामुळे सुट्ट्यांचे सध्याचे वेळापत्रक बदलणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून राज्याने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा (एनसीआरटी) अभ्यासक्रम तसेच सीबीएससी परिक्षापद्धती स्वीकारली आहे. यामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी भुसे यांनी सविस्तर निवेदन केले.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने बनवलेली पाठ्यपुस्तके आवश्यक ते बदल करुन तयार होत आहेत. आपली सध्याची परीक्षा पद्धती पाठांतरावर अधारीत असून आता ती बदलणार आहे. नव्या पद्धतीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल व त्यांचे भविष्य घडेल, असा विश्वास शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला. सीबीएसई अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर सतत लक्ष ठेवले जाते. राज्य, देश व जागतिक पातळीवरील ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते, असे ते म्हणाले.
नवा अभ्यासक्रम कधी?
शैक्षणिक वर्ष इयत्ता
२०२५ पहिली
२०२६ दुसरी ते चौथी, सहावी
२०२७ पाचवी, सातवी, नववी, ११वी
२०२८ आठवी, १०वी, १२वी