मंगल हनवते, लोकसत्ता
मुंबई : म्हाडा सोडतीसाठीच्या नव्या उत्पन्न मर्यादेचा फटका मासिक दीड लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांपाठोपाठ आता इतर गटांनाही बसत असल्याचे स्पष्ट झाले आह़े पुणे मंडळाच्या ५ हजार ०६९ घरांच्या सोडतीत अल्प गटासाठी ३,१५० घरे असतानाही या गटासाठीची उत्पन्न मर्यादा मासिक ५० हजार ते ७५ हजार करण्यात आल्याने बहुतांश गरजू सोडतीतून बाद ठरतील़़
राज्य सरकारने म्हाडा सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेत नुकताच बदल केला आहे. त्यानुसार पुणे मंडळाच्या सोडतीला नवीन उत्पन्न मर्यादा लागू झाली आहे. याआधी मासिक २५ हजार ते ५० हजार रुपये उत्पन्न असणारा अल्प गटात मोडत होता़ मात्र, आता हा गट ५० हजार ते ७५ हजारापर्यंतच्या उत्पन्नधारकासाठी असल्याने मासिक ५० हजार रुपयांपर्यंत कौटुंबिक उत्पन्न असलेला इच्छुक सोडतीतून बाद ठरला आहे. या सोडतीत अत्यल्प गटासाठी केवळ २६९ घरे आहेत. त्यातही यातील १७० घरे पुणे पालिकेच्या हद्दीबाहेर असून पुणे, िपपरी-चिंचवड हद्दीत केवळ ९९ घरे आहेत. यामुळे मासिक ५० हजारांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या फार कमी जणांना त्याचा लाभ मिळेल आणि या उत्पन्न गटातील मोठा वर्ग या सोडतीतून बाद ठरेल़ त्यामुळे उत्पन्न मर्यादेतील त्रुटी दूर करण्याची मागणी होत आहे.
उत्पन्न मर्यादेमुळे
अर्ज करू शकत नसल्याबाबतच्या तक्रारी येत आहेत. त्याचवेळी उत्पन्न मर्यादा बदलण्याची वा त्यातील त्रुटी दूर करण्याची मागणी होत आहे. या सोडतीपासून मूळ गरजू वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे मंडळाकडून उत्पन्न मर्यादेतील त्रुटी दूर करण्याची मागणी म्हाडा प्राधिकरणाकडे करण्याचा विचार सुरू आहे.
– नितीन माने, मुख्य अधिकारी, पुणे मंडळ, म्हाडा