बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून कर्करोगाचे प्रमाणही वाढत आहे. कर्करोग आणि प्रामुख्याने चेतासंस्थेच्या कर्करोगावरील (न्यूरो-ऑन्कोलॉजी) उपचारासाठी रुग्णालय, संशोधन केंद्र वा उच्च शिक्षण देण्यासाठीची संस्था मुंबई वा लगतच्या परिसरात उभारण्यात आशियातील तज्ज्ञांना रस असेल तर महाराष्ट्रात त्यांचे स्वागत आहे, सरकार त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आशियातील चेतासंस्थेच्या कर्करोगतज्ज्ञांच्या परिषदेत दिली.
‘एशियन सोसायटी फॉर न्यूरो-ऑन्कोलॉजी’च्या (अ‍ॅस्नो) दहाव्या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. ‘अ‍ॅस्नो’चे अध्यक्ष डॉ. राकेश जलाली, टाटा स्मारक केंद्राचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, डॉ. सी. ई. देवपुजारी आणि आशियातील विविध देशांमधून आलेले नामांकित तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते. ही परिषद २४ मार्चपर्यंत मुंबईत चालणार आहे.
अशा परिषदांमुळे उपचाराच्या नवीन पद्धती, संशोधन, तांत्रिक विकास यांच्या आदान-प्रदानाची संधी डॉक्टरांना, तज्ज्ञांना मिळते. त्यातून देशोदेशीच्या आरोग्य सेवेत सुधारणा होते व त्याचा लाभ लोकांना मिळत असतो, असे नमूद करत मुख्यमंत्री चव्हाण यांनी ‘अ‍ॅस्नो’च्या उपक्रमाचे कौतुक केले. राज्य सरकारने महिला व मुलांना होणाऱ्या कर्करोगांवरील उपचाराच्या विशेष केंद्रासाठी टाटा रुग्णालयाला आणखी जागा दिली आहे. कर्करोग, मेंदूचा कर्करोगावरील अत्याधुनिक उपचार, संशोधन, उच्च शिक्षणाला चालना देण्याची सरकारची भूमिका आहे. त्याबाबत मुंबई-महाराष्ट्रात येऊन संस्था उभी करायची असल्यास आशियातील तज्ज्ञांचे महाराष्ट्रात स्वागत आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
सरकारचे पहिले काम हे राज्यातील सर्व लोकांपर्यंत प्राथमिक आरोग्याच्या सेवा पोहोचवण्याचे व त्या पुरवण्याचे आहे. त्यामुळे विशिष्ट रोगांच्या उपचारासाठी काम करण्यात सरकारला मर्यादा पडतात. त्यामुळे आता सरकारने विविध रोगांवरील मोफत उपचार, शस्त्रक्रियांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे. आतापर्यंत ती महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांत होती ती एप्रिलपासून संपूर्ण राज्यभर लागू होईल. हृदयरोग, कर्करोग यासारख्या रोगांवरील शस्त्रक्रियासाठीही तिचा उपयोग होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा