मुंबईतील ८९ क्लबचे बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत आहे, याची सरकारच्या वतीने चौकशी करण्याची घोषणा गुरुवारी विधान परिषदेत करण्यात आली. तर कांदिवली येथील मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या (एमसीए) बांधकामाबाबत चुकीचे उत्तर दिल्याचा निषेध करीत शिवसेनेने सभात्याग केला.
कांदिवली येथे एमसीएला दिलेली जागा व त्यावर करण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांसदर्भात शिवसेनेचे रामदास कदम यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याबाबत तसेच रेस कोर्सवरील थीम पार्कच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांनी भेटीसाठी वेळ दिली नाही. मात्र अतिरिक्त आयुक्त असताना कुंटे यांनीच २००३ मध्ये एमसीएला लगेच जागा मंजूर करून टाकली. त्या जागेवर क्रिकेटऐवजी पंचतारांकित हॉटेल व दारूचे बार उभारण्यात आल्याचा व २४ टक्के अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप कदम यांनी केला. नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी मात्र बांधकाम कायदेशीर असल्याचा दावा केला. तर उपसभापती वसंत डावखरे यांनी एमसीएला भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत महापालिकेला आदेश द्यावेत, असे सरकारला निर्देश दिले. त्यामुळे सतंप्त झालेल्या शिवसेनेच्या सदस्यांनी सरकारचा निषेध करीत सभात्याग केला. काही सदस्यांनी मुंबईतील इतर क्लबच्या बांधकामांबद्दल प्रश्न उपस्थित केला.

Story img Loader