महाराष्ट्र सरकारने दहीहंडी मंडळं, गोविंदा पथकांच्या समन्वय समितीसोबत घेतलेल्या बैठकीनंतर दहीहंडीच्या आयोजनाला परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींची बैठक आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये नक्की काय घडलं आणि पुढील आपली भूमिका काय आहे हे समन्वय समितीने बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे.

करोनामुळे मागील वर्षी मुंबई, ठाण्यासहीत राज्यभरातील दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा केला नव्हता. यंदा छोट्या प्रमाणात का असेना उत्सवाला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. जागेवरच मानाची हंडी फोडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी समन्वय समितीने प्रशासनाकडे केली. तसेच सर्व गोविंदांना लशीचे दोन डोस पूर्ण करणार आणि सुरक्षित दहीहंडी उत्सवाची जबाबदारी आमची असेल असं या बैठकीमध्ये समन्वय समितीने सरकारला सांगितलं. हा उत्सव जागतिक स्तरावर टीकावा अशी बाजू समन्वय समितीने मांडली. गणेशोत्सवाप्रमाणे नियम आखण्याची मागणीही समितीने केली. मात्र बैठकीला उपस्थित असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी का देऊ शकत नाही हे समन्वय समितीच्या सदस्यांना समजावून सांगितलं. माजी राज्यमंत्री सचिन अहीर यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीमध्ये काय चर्चा झाली याबद्दलची माहिती दिली.

नक्की वाचा >> ‘दहीहंडी साजरी करणारच’ म्हणणाऱ्या राम कदमांना समन्वय समितीचा टोला; मुख्यमंत्र्यांचा संदर्भ देत म्हणाले…

एकदा परवानगी दिली आणि प्रभाव वाढला तर उत्सवाला आणि संस्कृतीला गालबोट लागेल. यावेळी तुमची इच्छा असली तरी सरसकट परवानगी देता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आम्ही गोविंदा पथकांवर लक्ष कसं ठेवणार. यंत्रणांवरील ताण वैगेरे पाहता मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आवाहन केलं आहे. परवानगी नसल्याने आम्ही दहीहंडीचं आयोजन न करण्याची भूमिका घेणार आहोत, असं समन्वय समितीने सांगितलं आहे.

समितीच्या वतीने आम्ही देखील दहीहंडी साजरा न करताना सामाजिक कार्यक्रम राबवण्याचं आवाहन केलं आहे. चर्चा होत नाही अशी तरुणांची खंत होती. सरकारने यावर चर्चा केल्याबद्दल त्यांचा आभारी आहे. त्यांनी कळकळीची विनंती केली असून करोनाची आकडेवारीदेखील समोर मांडली. निती आयोगाने दिलेल्या सूचनांची चर्चा टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी केली. दहीडंडी प्रातिनिधिक करु शकतो का असंही यावेळी काहीजणांनी सुचवलं. पण दहीहंडी होऊ नये अशी टास्क फोर्सने भूमिका मांडल्याचं समन्वय समितीने या बैठकीतील तपशील देताना पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं.