संचालकाच्या ‘बिनपगारी’ नियुक्तीनंतर कंत्राटी पदांसाठी जाहिरात

मुंबई : राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात जिल्ह्य़ापासून मंत्रालयापर्यंत शेकडो अधिकारी असले तरी नोव्हेंबरअखेरीस निवृत्त झालेले संचालक शिवाजी मानकर यांच्या जागेवर वेळेत दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्याने मानकर यांचीच पुढे १५ दिवस बिनपगारी नेमणूक करण्याची वेळ माहिती व जनसंपर्क संचालनालयावर आली. आता तर कंत्राटी तत्त्वावर अनुभवी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. त्यामुळे ‘निवृत्त अधिकारी आवडे राज्य सरकारला’ असे चित्र आहे.

ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा लाभ घेण्याच्या निमित्ताने मर्जीतील निवृत्त अधिकाऱ्यांची वर्णी कंत्राटी तत्त्वावर लावण्याची पद्धत राज्य सरकारने अंगिकारली आहे. नुकतीच राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदावर निवृत्त सनदी अधिकारी किरण कुरुंदकर यांची  कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आली. सचिव सारखे बदलत असल्याने आयोगाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे कारण देत कुरुंदकर यांना कंत्राटी तत्त्वावर नेमण्यात आले. राज्य सरकारच्या योजना, निर्णयांच्या प्रसिद्धीचे काम करणाऱ्या माहिती खात्यातही हाच प्रकार घडला. शिवाजी मानकर हे ३० नोव्हेंबरला संचालकपदावरून निवृत्त झाले. मात्र, त्याच दिवशी विभागाने आदेश काढला आणि १५ दिवसांसाठी मानकर यांची बिनपगारी नियुक्ती झाली. अजय अंबेकर रजेवर असल्याने विभागात एकही संचालक नाही अशी परिस्थिती उद्भवत असल्याने मानकर यांना १५ दिवसांसाठी कामाची जबाबदारी सोपवत असल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले. तसेच या कामासाठी मानकर यांना कसलाही मोबदला दिला जाणार नाही, असेही त्या आदेशात नमूद करण्यात आले होते. कोणताही अधिकारी अचानक निवृत्त होत नाही. मानकर यांच्या निवृत्तीची तारीख ठाऊक असताना त्यांच्या जागेवर पदोन्नतीने किंवा थेट सेवा भरतीने संचालक नेमण्याची प्रक्रिया वेळेत का पार पाडली गेली नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

त्याचबरोबर आता लोकसंवाद केंद्र, नवीन जाहिरात धोरणांची ऑनलाइन अंमलबजावणी, माध्यम प्रतिसाद केंद्राचे उन्नतीकरण करणे आदी कामांसाठी महासंचालनालयात पद भरण्यात येणार असून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची कंत्राटी तत्त्वावर नेमणूक त्यासाठी करण्यात येणार आहे. त्यासाठी जाहिरातही काढण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सध्या ही कामे करू शकेल असा अधिकारी नाही का, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत असून राज्य सरकारचा पैसाही या नियुक्तीमुळे खर्च होणार आहे.

संचालकाची रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. जाहिरात दिलेले पद विशिष्ट काळापुरते, तेही कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहे. विभागात कामाचा प्रचंड व्याप असल्याने या पदाची जाहिरात देण्यात आली आहे. त्याचा संचालकपदाच्या नियुक्तीवर कसलाही परिणाम होणार नाही. नोव्हेंबरमध्ये मानकर निवृत्त झाले. त्याआधी देवेंद्र भुजबळ निवृत्त झाले. अंबेकर कौटुंबिक कारणास्तव रजेवर होते. तीन संचालक सेवेत नसल्याने जबाबदारीचे काम पार पाडण्यात अडचण येणार होती. त्यामुळे ते काम पाहण्यासाठी मानकर यांना कोणताही मोबदला न देता त्यांची काही दिवसांसाठी सेवा घेतली होती.

-ब्रिजेश सिंह, महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

Story img Loader