मुंबई : जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी सोमवारपासून राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा परिणाम मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांवर होऊ लागला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या नायर आणि शीव रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून बाह्यरुग्ण विभागातील आरोग्य सेवेवर ताण येऊ लागला आहे. तसेच खासगी रुग्णालयातील आरोग्य सेवेवरही किंचित ताण पडत असल्याचे निदर्शनास आले आहे.
हेही वाचा >>> ऐरोली काटई टेकडीचा परिसर सुरक्षित होणार ; एमएमआरडीए बांधणार संरक्षक भिंत
संपामुळे जे. जे., जीटी, कामा आणि सेंट जॉर्जेस या रुग्णालयांतील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे या रुग्णालयांतील आंतर रुग्ण सेवा आणि शस्त्रक्रियेवर परिणाम झाला आहे. त्याच पाठोपाठ आता बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण संख्येत घट होत आहे. मात्र ही घट होत असताना मुंबई महानगरपालिकेच्या शीव आणि नायर रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागावर ताण वाढू लागला आहे. नायर रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये साधारणपणे दररोज १५०० ते दोन हजार रुग्ण येतात. मात्र मागील तीन दिवसांपासून रुग्णांची संख्या दोन हजार ५०० ते दोन हजार ७०० च्या घरात गेली आहे. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने दुपारी १२ वाजता बंद होणारे बाह्यरुग्ण विभाग दुपारी ३ पर्यंत सुरू ठेवावे लागत आहेत. तसेच डॉक्टरांवर ताण पडत असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण राठी यांनी दिली. संप आणि रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन रुग्णालयातील विभागप्रमुख, डॉक्टर, प्राध्यापक, परिचारिका आणि कर्मचारी यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचे राठी यांनी सांगितले.
तसेच शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयातील रुग्णसंख्येत वाढ झाली असून, पूर्वीच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी बाह्यरुग्ण विभागाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे, असे शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.
हेही वाचा >>> मुंबई: एक लाख नागरिकांना दिली इन्फ्ल्यूएंझाची मात्रा
खासगी रुग्णालयांवरही काहीसा परिणाम राज्य सरकारी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांवर ताण येऊ लागला आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालये आणि क्लिनिकमधील रुग्णांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. एस. कदम यांनी दिली. मात्र संप लक्षात घेता आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना सर्व खासगी रुग्णालये आणि आयएमएशी संलग्न डॉक्टरांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.