उमाकांत देशपांडे, लोकसत्ता
मुंबई : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा कर्जतजवळील फिल्म स्टुडिओ विकत घेण्यात सरकारपुढे अडचणी आहेत. देसाई यांच्या आत्महत्येला चार महिने उलटूनही निर्णय घेण्यात आलेला नाही.
देसाई यांनी घेतलेले कर्ज आणि ‘एनडीज आर्ट वल्र्ड’च्या स्टुडिओची विक्री यासंदर्भातील दावा राष्ट्रीय कंपनी लवादापुढे (एनसीएलटी) प्रलंबित असल्याने राज्य सरकार प्रतीक्षा करीत आहे. देसाई यांनी एडेलविस फायनान्शियल सव्र्हिसेसकडून सुमारे १८५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांच्या परतफेडीच्या हप्तय़ांना २०१८ मध्ये उशीर होऊ लागल्याने कंपनीकडून तगादा लावण्यात आला. संपूर्ण कर्ज चुकते करणार असूनही वसुलीच्या त्रासाला कंटाळल्याने त्यांनी २ ऑगस्टला आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे वित्तसंस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा >>> याचिका केवळ आरोप करणारी; कारवाईची मागणी का नाही? ठाकरे कुटुंबीयांच्या मालमत्ताप्रकरणी न्यायालयाची सोमय्या यांना विचारणा
हा स्टुडिओ राज्य सरकारने विकत घ्यावा आणि देसाई यांच्यावर दबाव टाकून त्यांना आत्महत्येस भाग पाडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी राज्य सरकारकडे केली होती.
हा स्टुडिओ विकत घेण्यासाठी काही खरेदीदार पुढे आले आहेत. कर्ज देणाऱ्या वित्तसंस्थेस एवढी मोठी रक्कम कशी व का द्यायची, शासनाचे या व्यवहारात नुकसान आहे का आणि तो स्टुडिओ शासनास चालविता येईल का, असे काही आक्षेप शासन पातळीवर घेण्यात येत आहेत. त्यामुळे शासनाला कंपनी लवादाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
राज्य सरकारची हा स्टुडिओ विकत घेण्याची तयारी असली तरी खासगी वित्तसंस्थेस शासनाला पैसे देता येणार नाहीत. कंपनी लवादाने लिलाव पुकारल्यावर शासनाकडून पावले टाकली जातील.
– सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री