मुंबई : पहलगाममध्ये अतिरेकी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये असलेल्या राज्यातील नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमाने व रेल्वेची व्यवस्था करण्यात येत आहे. या मदतकार्याच्या श्रेयासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांतील नेत्यांची चढाओढ सुरू झाली. समन्वयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांना श्रीनगरमध्ये पाठविले असता सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विशेष विमानाने श्रीनगरला रवाना झाले. लगेचच मुख्यमंत्र्यांनी ‘एक्स’ वरून ८३ प्रवाशांची यादी जाहीर करीत त्यांना गुरुवारी मुंबईत आणणार असल्याचे जाहीर केले.
पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात राज्यातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून काश्मीरमध्ये असलेल्या ३०८ पर्यटकांशी सरकारने संपर्क साधला आहे व त्यांना परत आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. राज्य सरकारने मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
भाजपच्या मंत्र्यांनाच जबाबदारी
मृतांचे नातेवाईक किंवा जखमींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आशीष शेलार व मंगलप्रभात लोढा यांची मुंबईत तर माधुरी मिसाळ यांची पुण्यात समन्वयक म्हणून नियुक्ती केली. मुख्यमंत्र्यांनी ही सारी जबाबदारी फक्त भाजपच्या मंत्र्यांवर सोपविल्याने शिवसेनत अस्वस्थता पसरली. लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना विमानतळावर जाण्याचा आदेश दिला. दादा भुसे, गुलाबराव पाटील, योगेश कदम हे शिवसेनेचे मंत्री मुंबई विमानतळावर तर आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर हे पुणे विमानतळावर उपस्थित होते. तेथेही महायुतीत समन्वयाचा अभाव बघायला मिळाला.
मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबीयांचे सांत्वन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मीरमधील प्रशासकीय अधिकारी व संबंधितांशी मंगळवारी रात्रीपासूनच संपर्क साधून मृतदेह आणण्यासाठी आणि जखमींवर उपचारासाठी व्यवस्था केली. हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने हे तिघे डोंबिवलीचे रहिवासी असून त्यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले. फडणवीस यांनी डोंबिवलीला जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. कौस्तुभ गणवते व संतोष जगदाळे यांचे पार्थिव पुण्यात आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. फडणवीस यांनी सर्वांच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवर संपर्क साधून सांत्वन केले. फडणवीस यांनी इंडिगो विमानाची सोय करून ८३ प्रवाशांना गुरुवारी मुंबईत आणण्याची व्यवस्था केली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यासाठी मदत केली आहे.
शिंदे गटाकडूनही मदत
शिंदे यांनीही काश्मीरमध्ये गेलेल्या राज्यातील नागरिकांशी आणि हल्ल्यात मरण पावलेल्या व जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून मदतीसाठी काश्मीरमधील प्रशासन व यंत्रणांशी संपर्क साधला. राज्य सरकारच्या यंत्रणांमधील अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि विशेष विमानाने ते अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी श्रीनगरला रवाना झाले. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पातळीवरूनही मदतकार्य व संपर्काची व्यवस्था करण्यात आली आहे.
अजित पवारांचा थेट ओमर यांच्याशी संपर्क
काश्मीरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरूप परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून या पर्यटकांना तातडीने आवश्यक मदत पुरवण्याची विनंती केली. मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षात विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. केंद्र सरकार व जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक ती सर्व मदत मिळावी, यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या असल्याचे पवार यांनी सांगितले. या संपूर्ण प्रक्रियेवर पवार स्वतः लक्ष ठेवून असून, राज्य व केंद्र सरकारी संबंधित यंत्रणांशी ते सातत्याने संपर्कात आहेत, असे त्यांच्या कार्यालयाने नमूद केले आहे.