मुंबई : राज्य सरकारने हाफकिनला आणखी १६ औषधांची निर्मिती करण्याची परवानगी दिली आहे. परिणामी, हाफकिन निर्मिती करीत असलेल्या औषधांची संख्या २५ हून अधिक होणार आहे. हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळ निर्मिती करीत असलेल्या सर्पदंश, विंचूदंश आणि पोलिओवरील लस, खोकला व तापावरील औषध यांना जगभरामधून मागणी आहे. त्यामुळेच हाफकिनने २०२३ मध्ये २०४ कोटी रुपयांच्या औषधांची विक्रमी विक्री केली होती.
हाफकिन निर्मित सर्पदंशावरील लशीला श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, नेपाळ या शेजारील देशांमध्ये प्रचंड मागणी आहे. तर पोलिओवरील लशीला जगातील ४५ देशांतून मागणी आहे. त्यामुळेच २०२३ मध्ये हाफकिनने पोलिओ लशीच्या १ कोटी ३० लाख ८३ हजार ५३८ मात्रा तयार केल्या. त्याखालोखाल सर्पदंशाच्या लशीच्या १ लाख ६४ हजार ७२८, विंचूदंशाच्या लशीच्या ६ हजार ८३३ मात्रा तयार केल्या होत्या.
हेही वाचा : प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
देशाला परकीय चलन मिळवून दिल्याबद्दल २०२२ मध्ये हाफकिनला राज्य सरकारचा उत्कृष्ट निर्यातदार पुरस्कारही मिळाला आहे. या बाबी लक्षात घेता राज्य सरकारने हाफकिनला आणखी १६ औषधांची निर्मिती करण्यास मान्यता दिली आहे. औषधांची निर्मिती करताना त्याचे दर स्पर्धात्मक असावे, हे दर राष्ट्रीय औषधी किंमत प्राधिकरणच्या दरांशी सुसंगत असावे. उत्पादन क्षमतेच्या २० ते २५ टक्के उत्पादन खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी महामंडळाने प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्य सरकारकडून दिल्याची माहिती हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळाचे महाव्यवस्थापक एस. शंकरवार यांनी दिली.
हेही वाचा : पीडितांना नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश, ॲसिड हल्ल्याचे प्रकरण
हाफकिननिर्मित औषधे
ॲण्टासिड सस्पेशन १७० मिली, टॅब्लेट पॅरासिटेमॉल ५०० मिलिग्रॅम, टॅब्लेट पॅरासिटेमॉल ६५० मिलिग्रॅम, टॅब्लेट आयब्युप्रोफेन ४०० मिलिग्रॅम, सिरप आयब्युप्रोफेन ६० मिली, टॅब्लेट अझिथ्रोमायसिन ५०० मिलिग्रॅम, टॅब्लेट मेट्रोनायडेझोल २०० मिलिग्रॅम, टॅब्लेट मेट्रोनायडेझोल ४०० मिलिग्रॅम, टॅब्लेट फुरोझॉलिडॉन १०० मिलिग्रॅम, टॅब्लेट कॅल्शियम विथ व्हिटामिन ॲण्ड मिनरल, सिरप कॅल्शियम विथ व्हिटामिन ॲण्ड मिनरल, टॅब्लेट व्हिटामिन बी, सिरप व्हिटामिन बी, टॅब्लेट ॲस्कॉरबिक अॅसिड ५०० मिलिग्रॅम, टॅब्लेट टेलमिसरटन ४० मिलिग्रॅम, टॅब्लेट सिटाग्लिप्टीन १०० मिलिग्रॅम.