मुंबईकरांच्या ‘मत’धरणीसाठी राज्य सरकारची घाई

स्थानिकांचा विरोध, उच्च न्यायालयात प्रलंबित खटले आदी कारणांमुळे मुंबईभर मेट्रोमार्गाचे जाळे विणण्यात अडचणी येत असल्या, तरी २०१९मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी मुंबईकरांना मेट्रोची प्रत्यक्ष चाहूल लागू देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे मेट्रो उभारणीची कामे वेगाने सुरू असून २०१८च्या अखेरीस मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गाचे बांधकाम आणि रूळ जोडणीचे काम पूर्ण करण्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) प्रयत्न आहे.

मुंबईमध्ये सध्या एकाचवेळी मेट्रो २अ, २ ब, मेट्रो ७ आणि मेट्रो ३चे काम सुरू आहे. नियोजनानुसार २०१९पर्यंत मेट्रो ३चा पहिला टप्पा पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र स्थानिकांचा विरोध आणि उच्च न्यायालयातील प्रलंबित खटले यामुळे या कामाची मुदत काही काळ पुढे गेली. मात्र ज्या प्रकल्पांना स्थानिकांचा फारसा विरोध नाही, तसेच सर्व प्रकारच्या मान्यता मिळाल्या आहेत असे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा प्राधिकरणाचा मानस आहे. यामुळे प्राधिकरणातर्फे सध्या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या कामांवर भर देण्यात आला आहे. मेट्रो २ अ हा मार्ग दहिसर ते डी. एन. नगर असा असणार आहे. तर मेट्रो ७ चा मार्ग अंधेरी ते दहिसर असा असणार आहे. या मार्गासाठी आवश्यक ते बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. हे बांधकाम तसेच रूळ जोडणीचे काम डिसेंबर २०१८पर्यंत पूर्ण करण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न असेल, असे अतिरिक्त महानगर आयुक्तप्रवीण दराडे यांनी सांगितले.

मेट्रो २अ हा सुमारे १९ किमीचा मार्ग असून या मार्गात १७ स्थानके आहेत. तर मेट्रो ७ सुमारे १७ किमीचा मार्ग असून या मार्गात १३ स्थानके आहेत. मेट्रो ७ हा मार्ग सध्याच्या घाटकोपर ते वर्सोवा या मुंबई मेट्रो वनच्या अंधेरी स्थानकाशी जोडलेला असणार आहे. या मार्गावर चालविण्यासाठी लवकरच गाडय़ाही मागविण्यात येणार आहेत. या गाडय़ा दाखल झाल्या की या मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर ताताडीने मार्गावर सेवा सुरू करणे शक्य होणार आहे. मार्गाचे बांधकाम आणि रूळ जोडणीचे काम पूर्ण झाल्यावर सिग्नल, संवाद यंत्रणा अशी तांत्रिक कामे पूर्ण झाल्यानंतर गाडय़ांची चाचणी घेण्यात येईल. ही सर्व कामेही युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार असून हे दोन्ही मार्ग २०१९पर्यंत खुले करण्याचाही प्राधिकरणाचा प्रयत्न आहे.

Story img Loader