चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा हे चारही जिल्हे राज्य सरकारच्या कागदोपत्री नक्षलग्रस्त जिल्हे. मात्र, आता त्यांचा उल्लेख ‘नक्षलग्रस्त’ असा न करता ‘डावी कडवी विचारसरणीग्रस्त जिल्हे’ असा करण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या पत्रव्यवहारानुसारच राज्य सरकारने हा नामोल्लेख सुरू केला आहे. मात्र, त्यामुळे राज्यातील डाव्या विचारसरणीवर आधारलेल्या सामाजिक व सांस्कृतिक विद्रोही चळवळींपुढे त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नक्षलवाद्यांना शह देण्यासाठी केंद्र सरकारने नक्षलग्रस्त भागांच्या विकासाकडे अधिक लक्ष दिले आहे. त्याअनुसार केंद्रीय नियोजन आयोगाने देशभरातील ८२ नक्षलग्रस्त जिल्ह्य़ांसाठी अतिरिक्त अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. आयोगाने १८ सप्टेंबर २०१३ रोजी राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रात महाराष्ट्रातील चंद्रपूर व भंडारा या दोन जिल्ह्य़ांचा त्यात समावेश करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यानुसार राज्याच्या नियोजन विभागाने निधी मंजुरीसंदर्भात ८ जानेवारी २०१४ रोजी काढलेल्या आदेशात गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर व भंडारा या चार जिल्ह्य़ांना डावी कडवी विाचरसरणीग्रस्त जिल्हे असे म्हटले आहे. या चार जिल्ह्य़ांना २०१४-१५ या वर्षांत विकास कामांसाठी केंद्राकडून १२० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. नक्षलग्रस्तऐवजी डावी कडवी विचासरणीग्रस्त असा शब्द वापरल्याने एक नवा वैचारिक वाद त्यातून उभा राहण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांत नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून कबीर कला मंच या विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील काही कार्यकर्त्यांना अटक झाली. आता डावी कडवी विचारसरणीग्रस्त असा शब्द वापरला गेल्याने अशा विद्रोही चळवळींपुढेही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डाव्या-उजव्या संघर्षांला निमंत्रण
डावी कडवी विचारसरणीग्रस्त असा शब्द वापरून केंद्र सरकार व राज्य सरकर डावा व उजवा अशा संघर्षला निमंत्रण देत आहे. लोकशाहीत आपले विचार व्यक्त करण्याचा सर्वाना अधिकार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यावर कारवाई होऊ शकते. मात्र सरकारच्या अशा डाव्या-उजव्या विभागणीमुळे देश एका नव्या संघर्षांकडे जाण्याचा धोका आहे.
प्रकाश आंबेडकर (भारिप-बहुजन महासंघ)

पोलिसांची नजर

प्रत्यक्ष शस्त्र हाती घेतली नाही, तरी नक्षलवादी किंवा डाव्या कडव्या विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्यांवर पोलिसांची बारीक नजर असते आणि त्यांच्याविरोधात कारवाई होऊ शकते.
– पोलीस दलातील एक वरिष्ठ अधिकारी.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government implement new policy in naxal affected area