मुंबई : करोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्य सरकारने गर्दी कमी करण्याकरिता निर्बंध काहीसे कठोर केले आहेत. त्यानुसार रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडता येईल. तसेच खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. सरकारी कार्यालयांची दारे अभ्यगतांसाठी बंद करण्यात आली आहेत. मॉल्स, चित्रपट आणि नाटय़गृहे ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. तसेच उपाहारगृहांमध्ये ५० टक्केच प्रवेशाला परवानगी असेल. गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध रविवारी मध्यरात्रीपासून अंमलात येतील.
दरम्यान, लागोपाठ दुसऱ्या दिवशी राज्यात ४१ हजार नवे रुग्ण आढळले, तर १३३ जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला. केंद्रीय आरोग्य विभागाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत करोनाचे नवे १,४१,९८६ रुग्णांची नोंद झाली. यात ३,०७१ रुग्ण ओमायक्रॉनचे आहेत.
धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रम : फक्त ५० लोक
मॉल्स, व्यापारी संकुले : ५० टक्के क्षमतेने. अन्य अटी कठोर. रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद.
चित्रपट आणि नाटय़गृहे : ५० टक्के क्षमतेने.
शाळा व महाविद्यालये : – १५ फेब्रुवारीपर्यंत बंद.
– दहावी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांनी वेळोवेळी मार्गदर्शन करावे
व्यायामशाळा, तरणतलाव, जीम, ब्यूटी सलून्स : बंद राहणार
केसकर्तनालये : ५० टक्के क्षमतेने, रात्री १० ते सकाळी ७.
क्रीडा विषयक कायक्र्रम : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा वगळता अन्य स्पर्धा किंवा खेळ लांबणीवर. स्पर्धामध्ये प्रेक्षकांना प्रवेशबंदी.
मनोरंजन उद्याने, प्राणी संग्रहालये, किल्ले : बंद राहणार