कोकणातील आंब्याचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची सरकारची इच्छाशक्तीच नाही, अशी खरमरीत टीका करीत सत्तारूढ आघाडीच्याच सदस्यांनी करीत सरकारला विधानपरिषदेत घरचा आहेर दिला. कोकण कृषी विद्यापीठात संशोधक आहेत. मात्र त्यांच्याकडे यंत्रसामग्रीसह पायाभूत सुविधा व आवश्यक कर्मचारीच नसल्याची कबुली फलोत्पादन मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी दिली. पुढील सहा महिन्यांत रिक्त पदे भरून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन गावीत यांनी दिले.
विजय सावंत, जयवंतराव जाधव यांनी दिलेल्या लक्षवेधीवर विद्या चव्हाण, अलका देसाई या सत्तारूढ सदस्यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले. वाईट हवामान, कीड, फळ गळून पडणे आदी कारणांमुळे गेली सात वर्षे आंब्याचे नुकसान होत असून शेतकरी त्रस्त आहे. त्यांच्यासाठी सरकार काहीच करीत नाही. कोकण कृषी विद्यापीठाचा केवळ नावालाच आहे, तिथे काहीच होत नसल्याची टीका दोन्ही बाजूच्या सदस्यांनी केली. देवगडजवळील केंद्रात प्रयोगशाळा सुरू करण्याची मागणी भाई गिरकर यांनी केली. सरकार व अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांची दया कधी येणार, असा सवाल अलका देसाई व विद्या चव्हाण यांनी केला.त्यावर कृषी विद्यापीठाच्या संशोधनामुळे पूर्वी एकरी अडीच टन येणारे उत्पादन १५-१६ टनांपर्यंत गेले, असा दावा डॉ. गावीत यांनी करताच अनेक सदस्य संतापले. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे ते वाढले असून विद्यापीठाचे हे श्रेय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.