मधु कांबळे, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : राज्यात गेल्या दीड वर्षांत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांवर ६११ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. एक कोटीपेक्षा जास्त खर्चाचे २० सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून त्यावर सुमारे २६० कोटी रुपये खर्च करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर सर्वाधिक खर्च करण्यात आला आहे.

महायुती सरकारमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सांस्कृतिक कार्य खात्याचा कार्यभार आहे. मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली. सांस्कृतिक कार्य विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबरोबरच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांवर खर्च करण्याचा धडाकाच लावला आहे. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने राज्यात ३० जून २०२२ नंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांवर झालेल्या खर्चाची मागणी माहिती अधिकार कायद्यानुसार केली होती. त्यावर या विभागाने ऑगस्ट २०२३ अखेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांवर ५०९ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती दिली. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केलेले सुमारे २०० हून अधिक ‘शासन आदेश’ माहिती अधिकारातून प्राप्त झाले. त्यानंतर पुढील पाच महिन्यांच्या म्हणजे जानेवारी २०२४ अखेर पर्यंतच्या शासन आदेशांचे अवलोकन केले असता, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांवरील खर्चाचा आकडा ६११ कोटी ९४ लाख ६० हजार ७६३ रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा >>> मराठा सर्वेक्षण ९० टक्के पूर्ण; प्रशासनाचा दावा, आचारसंहितेपूर्वी अहवाल सरकारकडे?

राज्य शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग असा एकच प्रशासकीय विभाग आहे. या विभागासाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात एकूण ३१७७.८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात पर्यटन विभागासाठी १९१५ आणि सांस्कृतिक कार्य विभागासाठी १२६२.८० कोटी तरतूद आहे. त्यात वेतनावरील खर्च आणि विविध योजनांवरील खर्चाचा समावेश आहे. त्या अंतर्गतच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी ८४४ कोटींची तरतूद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक सोहळयासाठी चालू अर्थसंकल्पात ३५० कोटी रुपये प्रस्तावित केल्याची घोषणा करण्यात आली होती, परंतु स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत त्यासाठी तूर्तास ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाने दिली आहे. त्याशिवाय, स्वांतत्र्यांच्या अमृतमहोत्सवाअंतर्गत राष्ट्रपतींचे स्वागत आणि संसदीय समितीच्या दौऱ्यांच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर मुक्त हस्ते खर्च करण्यात आल्याचे माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होते.

एक कोटीहून अधिक खर्चाचे काही कार्यक्रम

– नदी पुनर्भरण, हॅलोऐवजी वंदेमातरम अभियान- १ कोटी ६९ लाख ४३ हजार ३७३ रुपये

– महावाद्य मेळावा, वाद्य महोत्सव-१ कोटी ०७ लाख ३६ हजार रुपये

– पंचायत समिती स्थरावर स्वराज्य महोत्सव-३५ कोटी ४५ लाख रुपये

– मेरी माटी मेरा देश, सांस्कृतिक महोत्सव-१ कोटी ५० लाख रुपये

– स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एक छत्र योजना निधी वितरण- ६० कोटी १८ लाख ८० हजार २४४ रुपये

– घरोघरी तिरंगा, ध्वज पुरवठा-३ कोटी १५ लाख रुपये

– महाराष्ट्रात साडे तीन शक्तीपीठ रथाचे प्रदर्शन -१ कोटी १३ लाख २० हजार रुपये

– स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव, चंद्रपूर- ३ कोटी रुपये

– महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२०२१) वितरण सोहळा खर्च-३ कोटी ५४ लाख ६३ हजार रुपये

– प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक महोत्सव-२० कोटी रुपये

– फिल्मफेअर कार्यक्रम प्रायोजकत्व खर्च-१३ कोटी रुपये

– चंद्रपूर-महाकाव्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम- २ कोटी ४७ लाख ७५ हजार रुपये

– मुंबई-गेट वे ऑफ इंडिया-महाकाव्य रामायण महोत्सव- ३ कोटी ५० लाख रुपये ( ३१ जानेवारीला हा कार्यक्रम पार पडला.) स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवांतर्गत वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.)

खर्च होणारच : सुधीर मुनगंटीवार

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून आपल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांवर मोठया प्रमाणावर खर्च झाला आहे, हा खर्च अधिक आहे, असे वाटत नाही का, असे सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता, त्यांनी झालेल्या खर्चाचे समर्थन केले. ‘‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि शिवराज्यभिषेक या कार्यक्रमांवर मोठा खर्च झाला आहे. हा पैसा कलाकारापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी आपली भूमिका आहे. त्यामुळे पाच-पन्नास कोटी रुपये खर्च झाला तर बिघडले कुठे,’’ असा सवाल त्यांनी केला. आपण सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडी घेतली पाहिजे. महाराष्ट्राला एक सांस्कृतिक परंपरा आहे, या क्षेत्रातही आपण पुढे असले पाहिजे, असेही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government spent 611 crore on cultural events in last 18 month zws