गेल्या वर्षीच्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर यंदा सुरुवातीपासूनच चांगला झालेला पाऊस किंवा काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाचे असलेले संकट ही परिस्थिती असताना दुसरीकडे कायम दुष्काळी समजल्या जाणाऱ्या भागात टँकर आणि गुरांच्या छावण्यांवर राज्य सरकारला प्रतिदिन लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत.
राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १५१.२ टक्के पाऊस झाला आहे. चंद्रपूर आणि वाशिम या दोन जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या २०० टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. मुंबई (१४२ टक्के), ठाणे (१३९ टक्के) तर रायगडमध्ये १४८ टक्के पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. विदर्भात तर पावसाने हाहाकार उडविला आणि शेती धोक्यात आली. पीके हातातून गेल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विदर्भातील लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. विदर्भासह कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांच्या मदतीकरिता गेल्याच आठवडय़ात १९३४ कोटींची मदत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केली.
एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे टँकर्स आणि गुरांच्या छावण्यांची मागणी कमी झालेली नाही. आटपाडी, माण, जत, सांगोला, तासगाव, खटाव आदी कायमस्वरूपी अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यांमध्ये अद्यापही टँकर्स आणि गुरांच्या छावण्या सुरू ठेवाव्या लागल्या आहेत. या भागातील गुरांच्या छावण्यांमध्ये सध्या अडीच लाख गुरे असून, १५०० टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. मान्देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात ऑगस्ट नंतरच पाऊस पडतो, असा अनुभव आहे. परिणामी शासकीय अधिकारी अजूनही आशावादी आहेत. एकीकडे अतिवृष्टी आणि दुसरीकडे दुष्काळी परिस्थिती ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारला दीर्घकालीन उपाय योजावेच लागतील, असे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले. मात्र त्यासाठी सरकारला काही हजार कोटी खर्च करावे लागतील.

जलसाठा ६८ टक्के
चांगल्या पावसामुळे राज्यातील जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या ६८ टक्के साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात ३८ टक्के तर २०११ मध्ये या वेळी ५१ टक्के साठा झाला होता. चांगला पाऊस झाल्यावरही मराठवाडा आणि नाशिक परिसरात पाण्याचा साठा झालेला नाही. आतापर्यंत कोकणात एकूण क्षमतेच्या ८३ टक्के साठा झाला आहे. मराठवाडा (३३ टक्के), नागपूर (८४ टक्के), अमरावती (७५ टक्के), नाशिक (४५ टक्के) तर पुण्यात ८१ टक्के साठा झाला आहे.

Story img Loader