शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याचे दाखवून मुंबईतील अनेक शाळांमधील अर्धवेळ ग्रंथपालांचे वेतन थांबविण्यात आल्याने त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.
शालेय शिक्षण विभागाने वारंवार कोणत्याही अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याला कमी केला जाणार नसून त्यांचे वेतनही बंद केले जाणार नाही, असे घोषित केले आहेत. तरीही विद्यार्थी संख्या कमी झाल्याचे कारण देत अर्धवेळ ग्रंथपालांना वेतन देता येत नाही, असे आदेश मुंबईच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिले आहे. त्यामुळे त्यांचे वेतन थांबविण्यात आले आहे. या ग्रंथपालांवर हा अन्याय कशासाठी असा सवाल करत शिक्षण परिषदेचे मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी या ग्रंथपालांचे वेतन सुरू करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांना सोमवारी निवेदन देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
एकिकडे वाचनसंस्कृती वाढावी यासाठी सरकार वाचन दिन साजरा करीत आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ात ग्रंथमहोत्सव आयोजित करीत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शाळेच्या शिक्षकांसोबतच ग्रंथपालांचे मोठे योगदान असते. जर शाळेतील ग्रंथालयाची देखभाल ठेवणारे ग्रंथपालच शाळेत नसतील तर मुलांची पावले ग्रंथालयाकडे वळतील कशी, असा सवाल बोरनारे यांनी केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा