मुंबई : दादर येथील इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आकार घेत आहे. मात्र या प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राज्य सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. पुतळ्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारची विशेष उपसमिती गुरुवारी सकाळी गाझियाबादला रवाना झाली. ही समिती पुतळ्याच्या २५ फुटी प्रतिकृतीची पाहणी करणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून अंतिम मंजुरी घेऊन पुतळ्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> मुंबई : युवा सेना सचिव दुर्गा भोसले शिंदे यांचे निधन
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उभारणी करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१५ मध्ये स्मारकाचे भूमीपूजन करण्यात आले होते. मात्र स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरुवात झाली. करारानुसार स्मारक फेब्रुवारी २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांमुळे प्रकल्पाला विलंब झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अद्याप राज्य सरकारची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प वेग घेऊ शकलेला नाही. पुतळ्याची उंची आणि प्रतिकृतीत अनेक बदल सुचविण्यात आले असून त्यानुसार पुतळ्याला अंतिम रूप देऊन त्यास राज्य सरकारची मंजुरी घेणे आवश्यक आहे. ही प्रकिया रखडल्याने स्मारकाचे कामही संथगतीने सुरू आहे.
सामाजिक न्याय विभागाने पुतळ्याच्या प्रतिकृतीला अंतिम रूप देण्यासाठी उपसमिती नेमली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर यांच्यासह १४ जणांचा त्यात समावेश आहे. या उपसमितीमधील सदस्य गुरुवारी सकाळी गाझियाबादला रवाना झाले. ज्येष्ठ आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार हा पुतळा घडविणार असून गाझियाबादमधील त्यांच्या कार्यशाळेत (स्टुडिओ) पुतळ्याची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> “जो आपली आई बदलतो त्याच्यावर…”, संजय राऊतांचा नारायण राणेंवर हल्लाबोल
या प्रतिकृतीची उपसमिती पाहणी करणार असल्याची माहिती आंनदराज आंबेडकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. या प्रतिकृतीची पाहणी करून पुतळ्याला अंतिम रूप देण्यात येणार असून त्यानंतर राज्य सरकार पुतळ्याला अंतिम मंजुरी देईल असेही त्यांनी सांगितले. पुतळ्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे स्मारकाच्या कामाला वेग आलेला नाही. राज्य सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ पुतळ्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल आणि त्यानंतर काम वेगाने पूर्ण करण्यात येईल, असे एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात उंच पुतळा
इंदू मिलमधील स्मारकात चबुतऱ्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ४५० फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. चबुतऱ्याची उंची १०० फूट असून पुतळ्याची उंची ३५० फूट असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील हा सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. मात्र अन्य महापुरुषांच्या पुतळ्यांच्या तुलनेत डॉ. आंबेड़कर यांचा हा जगातील तिसरा उंच पुतळा असेल, असा दावा करण्यात आला आहे.
प्रकल्पाचे एकूण २७ टक्के काम पूर्ण
स्मारकाच्या कामाला २०१८ पासून सुरुवात झाली असून आतापर्यंत प्रकल्पाचे २७ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील पायाभूत इमारतीचे ५३ टक्के, तर पुतळ्याचे १२ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुतळ्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर मार्च २०२५ पर्यंत काम वेगाने पूर्ण करण्यात येईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.