सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुंबई विभागात कोटय़वधींचा गैरव्यवहार उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून राज्य सरकारने मंगळवारी कार्यकारी अभियंत्यांसह २२ अभियंत्यांना निलंबित केले. याप्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदवून चौकशीचे आदेश देण्यात आले असून १९ कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मालाच्या दर्जा प्रमाणपत्रांची प्रयोगशाळेची खोटी कागदपत्रे सादर करून सरकारकडून करोडो रुपयांची बिले या अभियंत्यांशी संगनमत करून कंत्राटदारांनी हडपली आहेत.
हा गैरव्यवहार ९ सप्टेंबर २०११ ते १४ मार्च २०१४ या काळात झालेल्या २९ कामांबाबत आहे. विभागाकडून होणाऱ्या कामांसाठी लागणारे सिमेंट, पोलाद, रेती व अन्य साहित्याच्या दर्जाची शासकीय प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. हे साहित्य चांगल्या दर्जाचे असल्याचा अहवाल कंत्राटदाराला बिलासोबत जोडावा लागतो. त्यासाठीचा खर्च निविदा रकमेत अंतर्भूत असतो. तरीही प्रयोगशाळेत तपासणी न करता हे साहित्य चांगल्या दर्जाचे असल्याचे खोटे अहवाल जोडून सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदारांनी बिले लाटली. महालेखापालांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये उत्तर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयातील बिलांची तपासणी केली असता काही कागदपत्रांबाबत संशय वाटला. त्यानंतर झालेल्या चौकशीत हे अहवाल बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे आता अन्य कार्यालयांमध्येही छाननी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराची व्याप्ती वाढण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. निलंबित झालेले अभियंते हे वांद्रे, अंधेरीसह मुंबईतील विविध कार्यालयांमधील आहेत. त्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी दिल्यावर सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास मंजुरी दिली. त्यानंतर निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले.
काळ्या यादीतले कंत्राटदार
सय्यद सिद्दिकी अली नासिर अली, किरण हाडवळे, काझी महम्मद रेहाना अन्य संस्था – गीतांजली, प्रभात, अभिनव, गिरनार, माता रमाई, तिरुपती, स्वामी विवेकानंद, दर्शना, शिवसाई, नवोदय, मिलिंद, समीर, श्रीगणेश, चारकोप गावकर, चंद्रमणी.
निलंबित अभियंते
’वांद्रे उपविभाग – उप अभियंता ए. एस. बोरसे, टी. जी. बंड, शाखा अभियंता एच. के. पाटील, एस. डी. केदारे, एस. बी. भागवत, ए. व्ही. थोरात, एस. एस. जाधव, एम. डी. देशपांडे, एम. व्ही. मांजरेकर, प्रकल्प पर्यवेक्षक एस. जी. पवार, एन. एन. जाधव, पी. जी. मोरे
’अंधेरी उपविभाग – कार्यकारी अभियंता के. पी. पाटील, सी. बी. पाटील, उप कार्यकारी अभियंता टी. जी. बंड, ए. एस. पोळ, उप अभियंता डी. एम. कुरेशी, शाखा अभियंता एस. जी. जाधव, ए. आर. घडले, प्रकल्प पर्यवेक्षक एस. एम. शेटय़े
’प्रकल्प पर्यवेक्षक कुर्ला –
व्ही. पी. जोशी, आर. पी. मेळेकर