पिळवणूक करणाऱ्या टोल संस्कृतीने हैराण झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी लवकरच नवीन टोलधोरण तयार करा, तसेच सध्या सुरू असलेलया सर्वच टोलनाक्यांवर होणाऱ्या आर्थिक उलाढालीची आणि कंत्राटांची तपासणी करून महिनाभरात अहवाल सादर करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सार्वजीनक बांधकाम विभाग आणि राज्य रस्ते विकास महामंडळास दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सार्वजनिक बांधकाम आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कारभाराचा आढावा घेतला. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे, या विभागाचे अप्पर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. टोलबाबत लोकांमध्ये प्रचंड नाराजी असून या समस्येची कायमची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांना दिलासा देण्यासाठी त्वरित नवीन टोलधोरण आणा असे आदेशही त्यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्याचे सूत्रांनी सांगितले. एकीकडे टोलचे नवीन धोरण आणत असतांनाच सध्याच्या टोल संस्कृतीमधून लोकांना दिलासा देण्यासाठी राज्यातील सर्वच टोलनाक्यांच्या कारभाराची आणि कंत्राटांची तपासणी करण्याचेही आदेश त्यांनी दिले. त्यानुसार सर्व टोलनाक्याचे कंत्राट, त्या मार्गावरील दैनंदिन वाहनांची संख्या, त्यातून मिळणारे उत्पन्न, कंत्राटाचा कालावधी या सर्वच बाबींची चौकशी केली जाणार असून त्याच्या आधारे काही टोलनाके बंद तर काही कंत्राटांबाबत फेरविचार करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा