भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेली लंडनमधील तीन मजली इमारत ३५ कोटी रुपयाला विकत घेण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. येत्या १४ एप्रिलला लंडनमध्ये या निवासस्थानाचे बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकात रुपांतर केले जाईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले.
बाबासाहेब आंबेडकरांचे १९२०-२१ या कालावधीत उच्च शिक्षणासाठी लंडनमध्ये वास्तव्य होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत त्यावेळी त्यांनी प्रवेश घेतला होता. त्या काळात तेथील तीन मजली इमारतीत त्यांचे वास्तव्य होते. अलीकडेच मालकाने ही इमारत लिलावात विकायला काढली होती. लंडनमधील बुद्धिस्ट संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारने ही वास्तू विकत घ्यावी, अशी विनंती केली होती. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातच हे निवासस्थान विकत घेण्यासंबंधात राज्याकडून केंद्र सरकारशी पत्रव्यवहार सुरू होता. सत्तातरानंतर मात्र हा विषय बाजूला पडण्याची भीती होती.
काही दिवस वाट बघून मालकाने ही इमारत विकायला काढली. त्यावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुन्हा सरकारशी संपर्क साधला. जागतिक परिषदेसाठी लंडनला गेलेले तावडे यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क  साधला तेव्हा हे निवासस्थान घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी लगेच मान्यता दिली. त्यानंतर तावडे यांनी लंडनमधील भारताच्या उच्चायुक्तांची भेट घेऊन या साऱ्या प्रक्रियेची माहिती दिली. सुमारे ३५ कोटी रुपयांना ही इमारत विकत घेतली जाणार आहे. इतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी आणखी काही कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
लंडनमधील बाबासाहेबांचे वास्तव्य असलेल्या निवासस्थानाचे आंतराष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याचा निर्णय ही महाराष्ट्रासाठी व देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया तावडे यांनी व्यक्त केली. राज्य सरकारच्या या निर्णयाचे भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वागत केले आहे.

Story img Loader