मुंबई : भारतीय अभिजात संगीतात आपल्या गायनशैलीने मोलाची भर घालणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेतला आहे. पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीला पुढील वर्षांच्या एप्रिलमध्ये प्रारंभ होत असून त्यानंतर वर्षभर त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
वयाच्या आठव्या वर्षी गायन करू लागलेल्या सिद्रामप्पा कोमकली यांचे गायन हा त्या काळातील एक अद्भुत चमत्कार होता. ध्वनिमुद्रणाचे तंत्र भारतात अवतरलेले असल्यामुळे अभिजात संगीताची कोणतीही ध्वनिमुद्रिका वाजण्यास सुरुवात झाली, की हा बालकलाकार कलावंताच्या बरोबरीने गात असे. जे गाणे पूर्वी कधीही ऐकले नाही, असे गायन बरोबरीने गाता येणे, ही गोष्ट कोणत्याही कलावंतासाठी सहजसाध्य नव्हतीच. त्यामुळे ‘कुमार गंधर्व’ हा सन्मान सार्थ करणाऱ्या कुमारजींनी लहान वयातच देशभर गायनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. मात्र नंतरच्या काळात, संगीताचे शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईत आले. प्रा. बी. आर. देवधर यांच्याकडून त्यांनी रागदारी संगीताचे धडे घेतले. आपल्या वेगळय़ा शैलीमुळे कुमारजींच्या गायनाकडे देशभरातील रसिकांचे विशेष लक्ष गेले. मात्र दुर्धर आजारामुळे त्यांना कोरडय़ा हवेच्या जागी राहणे आवश्यक ठरले. मध्य प्रदेशमधील देवास या गावी त्यांनी आपला मुक्काम केला आणि आजारातून बरे झाल्यानंतर पुन्हा तेवढय़ाच ताकदीने संगीताचा सारा आसमंत उजळून टाकला. त्यांच्याच नावाने स्थापन झालेल्या कुमार गंधर्व अॅकॅडमीतर्फे भारतीय संगीताचे शिक्षण देण्याचे कार्य आजही सुरू आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमात यंदाच्या वर्षी या संस्थेचा समावेश होता.
सोहळा असा.. नाशिक, पुणे आणि नागपूर या तीन शहरांमध्ये सांगीतिक मैफिली, तसेच नामवंत लेखक, कवी आणि चित्रकार यांच्यासमवेत परिसंवाद असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांसाठी राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने एकूण ४५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे.