मुंबईतील वाहनतळाची समस्या लक्षात घेऊन वाहनतळ बांधून देण्याच्या बदल्यात विकासकांना जादा चटईक्षेत्र देऊनही ज्या विकासकांनी वाहनतळ बांधून दिला नाही त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.
मुंबई महापालिकेने विकास नियंत्रण नियमावली ३३(२४) अंतर्गत शहरात ३०, पूर्व उपनगरात १० व पश्चिम उपनगरात १९ अशा ५९ विकासकांना जादा चटईक्षेत्र देऊन त्याबदल्यात ४२,६६४ गाडय़ांसाठी पार्किंग उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. तथापि, यातील काही हजार पार्किंगही विकासकांनी उपलब्ध करून न दिल्याबाबतचा प्रश्न आमदार बसवराज पाटील, मनीषा चौधरी, आशीष शेलार आदींनी उपस्थित केला. उत्तरादाखल गृहराज्यमंत्री म्हणाले, जेवढय़ा संख्येने पार्किंगसाठी जागा उपलब्ध होणे अपेक्षित आहे तेवढी उपलब्ध झाली नाही. यात अनेक मुद्दय़ांचा समावेश असून यासाठी येत्या पंधरा दिवसांत संबंधितांची बैठक घेऊन ज्या विकासकांनी चटईक्षेत्राचा वापर करून पार्किंग उपलब्ध करून दिले नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

Story img Loader