* विविध प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकार पुढे सरसावले
* फलाटाची उंची वाढवण्यापासून उन्नत मार्गापर्यंत अनेक प्रकल्पांवर चर्चा
मुंबईची जीवनवाहिनी असलेली उपनगरीय रेल्वे सेवा दर दिवशी वेगवेगळ्या कारणांमुळे कोलमडत असताना दुसरीकडे रेल्वे अधिकारी आणि राज्य सरकार यांनी या रेल्वेला रुळावर आणण्याचा विडा उचलला आहे. रेल्वेशी संबंधित मुंबईतील तसेच राज्यातील विविध प्रकल्पांचे काम मार्गी लागावे, यासाठी आता राज्य सरकार रेल्वेला पूर्ण सहकार्य करणार आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा मेट्रो प्रकल्प व सीएसटी-पनवेल उन्नत रेल्वेमार्ग यांचे एकत्रित नियोजन करण्याबरोबरच उपनगरीय स्थानकांचा विकास, फलाटाची उंची वाढवणे, वातानुकूलित लोकल गाडी धावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे; या सर्वच गोष्टींमध्ये राज्य सरकार आपला वाटा उचलणार आहे. याबाबतची बैठक नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्य़ाद्री येथे पार पडली. या बैठकीला मुंबई रेल्वे विकास महामंडळ, मध्य आणि पश्चिम रेल्वे यांचे उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते. मुंबईसह महानगर प्रदेशाचा विकास झपाटय़ाने होत असून त्यादृष्टीने रेल्वेचे जाळे मात्र पसरत नाही. तसेच रेल्वेची क्षमता कमी पडत असल्याने अनेक इतर पर्यायांचाही विचार केला जात आहे. मात्र रेल्वे आणि हे इतर पर्याय यांत समन्वय असावा, या दृष्टीने राज्य सरकार प्रयत्नशील आहे. रेल्वेचे राज्यातील तसेच मुंबईतील मोठे प्रकल्प राज्य सरकारच्या सहकार्याशिवाय पूर्ण होणे अशक्य आहे. याची जाणीव ठेवूनच ही बैठक घेण्यात आल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एका बडय़ा अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईतील उपनगरीय स्थानकांचा विकास करण्यासाठी रेल्वेकडे पुरेसा निधी नसल्याचे सांगितले जाते. मात्र आता त्यासाठी राज्य सरकार पुढे सरसावणार असून प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे, सरकते जिने-उद्वाहक बसवणे, पादचारी पूल उभारणे, स्वच्छतागृहे उभारणे आदी कामांसाठी राज्य सरकार रेल्वेला साहाय्य करणार आहे. या बैठकीत ठरल्याप्रमाणे मुंबईतील सर्व प्लॅटफॉर्मची उंची ९२० मिमीपर्यंत वाढवण्यासाठी मार्च २०१८ची मुदत ठेवण्यात येणार आहे. त्यासाठीही राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे. सध्या राज्य सरकारकडे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यादरम्यान मेट्रो उभारण्याचा प्रस्ताव आहे.
हा प्रकल्प उभारताना प्रस्तावित सीएसटी-पनवेल उन्नत रेल्वेमार्गासह त्याचे नियोजन करण्याचा विचारही या बैठकीत समोर आला आहे. त्यासाठी राज्य व रेल्वे एकत्रितपणे काम करणार आहेत, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या या अधिकाऱ्याने दिली.