‘समृद्धी’ महामार्गावर आता शहापूर तालुक्यात तीन नवनगरांची उभारणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे समृद्धी महामार्गावरील ठाणे जिल्ह्य़ातील चिंचवली आणि खर्डी येथील नवनगरे रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याऐवजी शहापूर तालुक्यातच सापगांव, फुगळे आणि हिव या तीन ठिकाणी ही नवनगरे उभारण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्तावाल मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून या नवनगरांच्या विकासासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) नियुक्ती करण्यात आली आहे.

येत्या तीन वर्षांत समृद्धी महामार्गाची बांधणी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. १२० मीटर रुंदीचा हा महामार्ग दहा जिल्ह्य़ांतील ३५० गावांतून जाणार आहे. या महामार्गावर ४५० हेक्टरवर एक याप्रमाणे २४ नवनगरांची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक १० हजार ८०० हेक्टर जमीन संपादित करण्याची कार्यवाही सुरू आहे. नवनगरांसाठी जागा देण्यास ठिकठिकाणी शेतकरी विरोध करीत असल्याने भूसंपादनाची प्रक्रिया केवळ जागा मोजणीपर्यंत सरकली आहे. त्यांतर आता शेतकऱ्यांच्या जमिनीला चांगला दर देणारे पॅकेज जाहीर करण्यास ‘एमएसआरडीसी’ने सुरुवात केली असून नाशिक जिल्ह्यासाठी दोनच दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या मदत पॅकेजला त्या भागातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. ‘समृद्धी’ विरोधाची ठिणगी ठाणे जिल्ह्यात पेटल्यांतर या महामार्गाविरोधातील आंदोलन राज्यभरात पेटले. त्यामुळेच ठाणे जिल्यातील जमिनीला मिळणारा मोबदला जाहीर करताना जिल्हा प्रशानस खबरदारी घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या विरोधाची धार बोथट करण्यासाठी कल्याण तालुक्यातील चिंचवली आणि शहापूर तालुक्यातील खर्डी येथील आधी घोषित करण्यात आलेली नवनगरे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नवनगरांसाठी जमीन देण्यात तीव्र विरोध करणाऱ्या धसई, शेंडेगाव, कोकांबे, बीरवाडी अशी काही गावे नवनगरातून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आता या प्रकल्पास होणारा विरोध मावळेल असा दावा मंत्रालयातील सूत्रांनी केला.

कल्याण तालुक्यातील चिंचवली येथील नवनगर रद्द करताना शहापूर तालुक्यात मात्र ६५ किमीच्या मार्गावर तीन नवनगरे विकसित केली जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने या महामार्गावरील  ठाणे, जालना, बुलडाणा आणि वर्धा या चार जिल्ह्य़ातील सात नवनगरांची अंतिम घोषणा केली असून त्यासाठी ‘एमएसआरडीसी’ नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबत नगरविकास विभागाने अंतिम अधिसूचनाही प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, अन्य जिल्ह्य़ांत एक एक नवनगर उभारले जात असताना केवळ शहापूर तालुक्यात तीन नवनगरे का, असा सवाल समृद्धी महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक बबन हरणे यांनी केला आहे. हा मार्ग आणि नवनगरे ही अधिकाऱ्यांच्या मर्जीने सरकार करीत आहे. शहापूर तालुक्यातील जमिनीला भाव असल्यामुळेच येथील शेतकऱ्यांना उध्वस्त करून त्यांच्या जमिनीवर नवनगरे उभारण्याचा हा घाट असून त्याविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा इशारही त्यांनी दिला आहे.

नवनगरे अशी..

* शहापूर तालुका : कासगाव, सापगाव, शेलवली आणि खुटघर या गावांच्या हद्दीत पहिले नवनगर, फुगळे आणि वाशाळा (बु.) येथे दुसरे नवनगर, हिव व रास या गावांदरम्यान तिसरे नवनगर

* जालना जिल्हा : जामवाडी, गुंडेवाडी आणि श्रीकृष्णनगर या गावांदरम्यान एकच नवनगर

* बुलडाणा जिल्हा : मेहकर आणि सिंदखेडराजा/ देऊळगाव राजा तालुक्यात दोन नवनगरे

* वर्धा जिल्हा:आर्वीत एकच नवनगर