मराठवाडय़ात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, पुढील महिन्याभरात पावसाने सावरले नाही, तर पिण्याचे पाणी, चारा, रोजगार, दुबार पेरणी वाचविणे आणि रोजगारासाठी मोठय़ा प्रमाणावर निधी लागणार आहे. त्याबाबतचे नियोजन सरकारने केले आहे, दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रसंगी कर्ज काढण्याची तयारी सरकारने केली आहे, अशी माहिती राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांना दिली.
परतीचा पाऊस चांगला झाला तर परिस्थिती सुधारेल, मात्र पावसाने दगा दिला तर राज्याला विशेषत मराठवाडय़ाला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. एकूण परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे.
अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. परंतु एकंदरीत सध्याची परिस्थिती गंभीर व चिंताजनक आहे, असे मुनगंटीवार यांनी निदर्शनास आणले.
दुष्काळी परिस्थिती हाताळताना त्याचा राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, रोजगार हमीची कामे, शेतकऱ्यांना स्वस्त दरात अन्नधान्याचा पुरवठा करणे आणि दुबार पेरणीच्या पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी उपायोजना करावी लागेल, त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर निधीची गरज भासणार आहे. त्याकरिता आवश्यकता वाटली तर कर्ज काढण्याची सरकारची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पात तरतूद केलेला विविध विभागांचा निधी शंभर टक्के खर्च होत नाही, शिल्लक राहिलेला निधीही दुष्काळ निवारण्याच्या कामासाठी वापरता येईल, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader