ल्ल
विशेष प्रतिनिधी, मुंबई
गोकुळाष्टमी म्हणजेच दहीहंडी हा उत्सव राज्याची सांस्कृतिक परंपरा जपणारा असल्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी रचण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांना साहसी खेळाचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे गोविंदा पथकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी १२ वर्षांखालील मुलांना बंदी तर १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना गोविंदा पथकात सहभागी होण्यासाठी घरच्यांचे संमतीपत्र द्यावे लागणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी दिली.
१२ वर्षांखालील मुलांना गोविंदा पथकांमध्ये सहभागी होण्यास बंदी घालण्याबरोबरच दहीहंडीसाठी धोरण तयार करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने वर्षभरापूर्वी राज्य सरकारला दिले होते. त्याचप्रमाणे दहीहंडी हा उत्सव राज्याची सांस्कृतिक परंपरा जपणारा महत्त्वाचा उत्सव असल्याने त्यात युवक- युवतींचा मोठय़ा प्रमाणात सहभाग असतो. दहीहंडी फोडण्यासाठी रचण्यात येणारे मानवी मनोरे चित्तथरारक असतात. या मनोऱ्यांच्या माध्यमातून संघभावना, साहस, जिद्द, चिकाटी, शारीरिक क्षमता या भावना वाढीस लागतात. हा एक क्रीडा प्रकार असल्यामुळे तो केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता १२ महिने कधीही खेळता यावा यासाठी त्याला खेळाचा दर्जा देऊन त्याचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी सरकारने आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली होती. या सामितीने दिलेल्या अहवालानुसार गोविंदा या मानवी मनोरे उभारावयाच्या प्रकारास साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले.
या खेळाची नियमावली राज्य संघटनेने तयार केल्यानंतर त्यांचे पालन करणे सर्व गोविंदा पथक आणि आयोजकांनाही बंधनकारक राहील.
दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांना चेस्टगार्ड, हेल्मेट, सेप्टी बेल्ट आदींचा वापर बंधनकारक करण्यात आला असून सर्व खेळाडूंचा विमा, तसेच प्रत्येक खेळाडू स्वत:च्या जबाबदारीवर स्पर्धेत सहभागी होत असल्याचे त्याचे हमीपत्र पथकांनी आयोजकांना द्यावे लागेल. त्याचप्रमाणे १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना चारपासून वरच्या थरांवर उभे राह्य़चे असल्यास त्याबाबत पालकांची लेखी परवानगी गोविंदा पथकाच्या व्यवस्थापनाकडे असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच १२ वर्षांखालील मुलांना हा खेळ खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दहीहंडीचे आयोजन करणाऱ्यांना त्या ठिकाणी तातडीचे वैद्यकीय पथक, खाली गादी, पाण्याची व्यवस्था, मोबाइल टॉयलेट व्हॅन, पोलीस बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी घ्यावी लागेल. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी दहीहंडी बांधण्यात येणार आहे, त्या जागेसाठी अग्निशमन दल, पोलीस, वाहतूक पोलीस आणि परिवहन खात्याचीही परवानगी घ्यावी लागेल.