चटईक्षेत्र निर्देशांकावर (एफएसआय) नियंत्रण ठेवून लोकसंख्या वाढ रोखू न शकल्याची कबुली देत मुंबईत एफएसआय वाढवण्यात येईल असे महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी ‘मुंबई नेक्स्ट’ परिषदेत सांगितले. मुंबईत परवडणारी घरे उपलब्ध होण्यासाठी हे आवश्यक असल्याचे आयुक्त म्हणाले. त्यामुळे आता मुंबईत वाढीव एफएसआय मिळून घरबांधणीला मोठी चालना मिळणार आहे. मुंबईच्या नवीन विकास आराखडय़ाचे प्रारूप १५ फेब्रुवारीपर्यत जाहीर होणार असून एफएसआयबाबतचे धोरण त्यावेळी स्पष्ट केले जाणार आहे.
मुंबईतील लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी चटईक्षेत्र निर्देशांकांवर बंधने आहेत. शहरात १.३३ तर उपनगरात टीडीआर गृहीत धरून २ एफएसआय दिला जातो. म्हाडामध्ये ३, झोपु योजनेसाठी ४ असा विविध प्रकारे एफएसआय मंजूर केला जातो.गेल्या १० वर्षांत चटईक्षेत्रनिर्देशांक नियंत्रित केल्याने शहरात मोठय़ा प्रमाणावर झोपडय़ा वाढल्या. मागणीच्या प्रमाणात घरे उपलब्ध होत नसल्याने घरांच्या किंमती वाढल्या. मुंबईत परवडणारी घरे उपलब्ध करून द्यायची तर एफएसआयवरील बंधने शिथिल करावी लागतील, असेही ते म्हणाले.  
मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेचे खापर कुंटे यांनी वीज, गॅस, दूरध्वनी आदी सेवासुविधा पुरविणाऱ्या एजन्सीजवर फोडले. तीन वर्षे रस्ते खोदले नाहीत, तर  खड्डे पडणार नाहीत, असे कुंटे म्हणाले.

Story img Loader