गुरुवार रात्रीपासून संततधार असलेल्या पावसामुळे मुंबई शहरात जागतिक योगदिनाचा फज्जा होईल असे चित्र असतानाही अवघी मुंबापुरी योगमय झाली होती. मरिन ड्राइव्हपासून ते गल्ल्यांमध्ये सोसायटय़ांमध्ये योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळांमध्येही योगदिनाला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र होते. पालिकेच्या शाळांपासून ते आयआयटी मुंबईपर्यंतच्या शैक्षणिक संस्थांमध्ये योगदिनाचे यशस्वी आयोजन पाहावयास मिळाले. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या निमित्ताने विलेपाल्रे पूर्व येथील मुंबई महापालिकेच्या दीक्षित शाळेत विद्यार्थ्यांसोबत योगासने केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शालेय अभ्यासक्रमामध्ये योगाचे धडे आणण्याचा आम्ही विचार करीत असल्याचे स्पष्ट केले. याबाबत शिक्षणतज्ज्ञ, योगतज्ज्ञ आदी संबंधितांशी सविस्तर चर्चा करून त्यानंतर निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले. योगाभ्यास हा लहान वयापासून सुरू केल्यास त्याचे अधिक महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी योगाभ्यास केल्यास त्यांना आपल्या अभ्यासावर आणि वाचनावर अधिक जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित करता येते, असेही तावडे म्हणाले. पावसामुळे मुंबईतील बहुतांश शाळांनी योगासने मैदानाऐवजी शाळेतील वर्गखोल्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतला.
समुद्राच्या साक्षीने योगासने
पावसाळय़ात समुद्राच्या उसळत्या लाटांचे दर्शन घेण्यासाठी मरिन ड्राइव्हवर गर्दी करणारा मुंबईकर रविवारी सकाळी ६ वाजता मोठय़ा संख्येने उपस्थित होता. समुद्राच्या साक्षीने मुंबईकरांनी योगासने करून रविवारची  सुरुवात केली. यावेळी उपस्थितांनी ध्वजवंदन करून कार्यक्रमास सुरुवात केली, तसेच योगासनाचा प्रचार आणि प्रसार करण्याची शपथही घेतली. इतकेच नव्हे तर शहरांतील विविध सोसायटय़ांमध्येही योगासनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध सरकारी आस्थापने तसेच खासगी आस्थापनांनीही योगादिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मंत्रालयात योग दिन साजरा
सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंत्रालयात केवल्यधाम संस्थेमार्फत योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह केंद्रीय राज्यमंत्री पियुश गोयल,  आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनीही प्रशिक्षणात सहभाग घेतला. तसचे राजभवानातही ब्रह्मकुमारी इश्वरीय विश्वविद्यालयातर्फे योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना रायपाल चे. विद्यासागर राव म्हणाले की, योग व राजयोगाच्या माध्यमातून मनुष्याची प्रतिकार शक्ती वाढवून एकूण जीवनमानाचा दर्जा निश्चितपणे उंचावता येऊ शकतो.

Story img Loader