बाल हक्क संरक्षण आयोगाने दहीहंडी फोडण्यासाठी १२ वर्षांखालील मुलांचा वापर करणाऱ्या पथकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले असून, वयाची अट शिथिल करण्यासाठी गोविंदा पथकांची धावपळ सुरू झाली आहे. दहीहंडी उत्सव अवघ्या २२ दिवसांवर आल्याने या प्रश्नातून मार्ग काढावा, असे गाऱ्हाणे गोविंदा पथकांनी राज्य सरकारला घातले असून या संदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक होत आहे.
दहीहंडी फोडण्यासाठी सर्वात वरच्या थरावर लहान मुलांचा वापर होत असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन १२ वर्षांखालील मुलांचा दहीहंडी फोडण्यासाठी वापर करणाऱ्या गोविंदा पथकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश बाल हक्क संरक्षण आयोगाने पोलिसांना दिले आहेत. मात्र ही बंदी दहीहंडी उत्सवाच्या दिवसासाठी आहे. त्यामुळे लहान मुलांचा सराव सुरूच राहील, असा पवित्रा अनेक गोविंदा पथकांनी घेतला होता. त्यानुसार सध्या लहान मुलांचा थर रचण्याचा सराव रात्रीच्या जागरात सुरू आहे.
दहीहंडी उत्सवाच्या दिवशी पोलीस कारवाईचा बडगा उगारला जाऊ नये यासाठी गोविंदा पथकांनी सरकार दरबारी धाव घेतली आहे. राज्य सरकारने मध्यस्थी करून हा प्रश्न सोडवावा, अशी विनंती गोविंदा पथकांकडून करण्यात येत आहे.
या संदर्भात सोमवारी मंत्रालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली असून काही निवडक मोठय़ा गोविंदा पथकांच्या प्रमुखांना बैठकीस बोलावण्यात आले आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, वैद्यकीय आरोग्य शिक्षण आणि फलोत्पादनमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे.
मंत्रालयात आज ‘गोविंदा’
बाल हक्क संरक्षण आयोगाने दहीहंडी फोडण्यासाठी १२ वर्षांखालील मुलांचा वापर करणाऱ्या पथकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले असून
First published on: 28-07-2014 at 03:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra govt to take decision on govinda