मुंबई : सभागृहातील गोंधळाचे निमित्त करून अभिभाषण अर्धवट सोडून व राष्ट्रगीतासाठीही न थांबता सभागृहाबाहेर निघून जाण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या कृतीचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निषेध करण्यात आला. राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांच्या या अवमानकारक वर्तनाबद्दल नापसंती व्यक्त करणारे पत्र राष्ट्रपतींना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्यपाल व राज्य सरकार यांच्यातील संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. त्यानुसार विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात अभिभाषणासाठी राज्यपाल कोश्यारी यांचे आगमन होताच, सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सदस्यांची घोषणाबाजी सुरू झाली. राज्यपालांनी भाषण वाचण्यास सुरुवात केली, परंतु सभागृहातील घोषणाबाजी व गोंधळाचे वातावरण बघून त्यांनी अवघ्या दोन मिनिटांत भाषण अर्धवट सोडून, ते तडक सभागृहाबाहेर निघून गेले. विधान भवनात नंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालांच्या वर्तनाचे पडसाद उमटले.