मुंबई : उपनगरी रेल्वेतून सर्वसामान्यांनाही प्रवासाची मुभा मिळावी यासाठी लोकांची वाढती मागणी, उच्च न्यायालयाने केलेली कानउघाडणी आणि विरोधकांचे आंदोलन, या पाश्र्वभूमीवर आता करोना लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना उपनगरी रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे संकेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्र वारी दिले.
‘करोनामुळे घातलेले र्निबध शिथिल करताना अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे. मुंबईत उपनगरी रेल्वे प्रवासाबाबत दोन आठवडय़ांपासून चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच रेल्वे प्रवासाबरोबरच इतर ठिकाणीही अशा व्यक्तींना काय सवलत देता येईल याबाबत विचार सुरू आहे,’ असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ‘अमेरिका, इंग्लंडसारख्या देशात लसीकरण बऱ्याच प्रमाणात झाले असूनही त्या देशांमध्ये आता करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य सरकार सर्वसामान्यांची काळजी घेत आहे हे लक्षात घेतले पाहिजे,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
भाजपचे आंदोलन
मुंबई : लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना उपनगरी रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याच्या मागणीसाठी भाजपने शुक्रवारी आंदोलन केले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा आदींनी यर्चगेट स्थानकाबाहेर निदर्शने केली.