वातावरण बदलांचे गांभीर्य लक्षात घेत अपारंपरिक स्रोतांचा वापर करणार
जगात जैव इंधानाच्या ज्यादा वापरामुळे जागतिक तापमान वाढीत भर पडत असल्याने अनेक देशांनी अक्षय्य उर्जेच्या वापरातून वीज निर्मितीचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे या वातावरणीय बदलांना प्रतिसाद देत महाराष्ट्रानेही अक्षय्य उर्जेच्या वापराचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्याच्या सागर किनाऱ्यांवर पवन उर्जा, सौर उर्जा, सागरी लाटा आदींपासून वीज निर्मिती करणारे प्रकल्प उभे राहणार आहेत.
जागतिक तापमान वाढीमुळे झालेले वातावरणीय बदल नजीकच्या काळात मानवी जीवनाला हानिकारक ठरण्याची शक्यता असल्याने सध्या जगातील प्रमुख देश सौर उर्जेसारख्या अक्षय्य उर्जा स्रोतांपासून वीज व इंधन निर्मितीकडे वळू लागले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातही असे प्रकल्प उभे राहणार असून महाराष्ट्र सागरी मंडळाने राज्याच्या सागरी किनाऱ्यांवर असे प्रकल्प उभे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात पवन उर्जेपासून वीज निर्मिती करण्यासाठी सागर किनारी पवन चक्क्य़ांची उभारणी, सागरी लाटांपासून तसेच सागरी प्रवाहांपासून वीजेची निर्मिती तसेच सोलार पॅनल्सची उभारणी करून सौर उर्जेची निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांचा समावेश आहे. यासाठी कोकणापासून मुंबईपर्यंतच्या प्रमुख ४८ बंदरांवर आणि जेथून सागरी जलवाहतूक सुरू आहे अशा जेट्टय़ांच्या ठिकाणी सुरूवातीला हे प्रकल्प उभे करण्याचा मंडळाचा मानस आहे.
यासाठीची निविदा प्रक्रिया मे महिन्यातच सुरू करण्यात आली असून आजच्या पाच जूनपर्यंत इच्छुकांकडून निविदा स्विकारल्या जाणार आहेत. अशी माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांनी दिली.
फायदा कोणाला?
राज्याच्या सागर किनाऱ्यांवर हे उर्जा निर्मिती प्रकल्प उभे राहील्याने त्यातून निर्माण झालेली वीज ही प्रथमत किनाऱ्यांवरील बंदरांना पुरवण्यात येणार असून त्याहीपेक्षा जास्त वीजेची निर्मिती झाल्यास किनारी भागातील स्थानिक गावांना पुरवण्यात येईल. जेणेकरून कोकणातील गावांचा वीजेचा अनुशेष भरून निघू शकेल. भविष्यात ज्यादा प्रकल्प उभे राहील्यास राज्याच्या अन्य भागातही वीज पोहचवता येणार आहे. हे प्रकल्प उभारल्याने स्थानिकांना मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
कार्बन क्रेडीट्ससाठीही प्रयत्न
जगभरात कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या देशांना ‘कार्बन क्रेडीट्स’ देण्यात येतात. ज्यांची नंतर अन्य देशांना विक्री देखील करता येते. यासाठी हे देश जैव इंधानाच्या वापरापेक्षा अक्षय्य उर्जा स्त्रोतांपासून वीज निर्मिती करतात. त्यामुळे, राज्यातही अक्षय्य उर्जेपासून वीज निर्मिती झाल्यास भविष्यात देशाला कार्बन क्रेडीट्स मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे महाराष्ट्र सागरी मंडळाने स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या सागर किनाऱ्यांमध्ये अक्षय्य उर्जास्त्रोतांचा वापर करून मोठय़ा प्रमाणात वीज निर्मिती करण्याची क्षमता आहे. यापूर्वी या क्षमतेचा उपयोग करण्यात आलेला नाही. फ्रान्स, जर्मनी आदींसारख्या देशात हे प्रयोग यशस्वी झाले असून महाराष्ट्राच्या सागर किनाऱ्यांवर हे प्रकल्प यशस्वी होऊ शकतात.
– अतुल पाटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ