डेंग्यूमुळे देशभरात होणाऱ्या मृत्यूंत महाराष्ट्राचा देशामध्ये पहिला क्रमांक लागला आहे. कर्नाटक, केरळ राज्यांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दुपटीहून अधिक असली, तरी डेंग्यू रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. राज्यात आतापर्यंत डेंग्यूमुळे २३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत डेंग्यूमुळे चौघांना प्राण गमावावे लागले असून त्यातील तिघांचा मृत्यू गेल्या महिन्याभरात झाला आहे.
राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत देशातील राज्यातील रुग्णांची व मृत्यूची नोंद केली जाते. देशात ऑगस्टपर्यंत डेंग्यूचे २२ हजार रुग्ण आढळले असून ७४ मृत्यू झाले आहेत. त्यातील सर्वात जास्त रुग्ण केरळमध्ये (रुग्ण ६५६२, मृत्यू २२) असून त्या खालोखाल कर्नाटकचा (४९०८-१२) क्रमांक लागतो. तामिळनाडू (३७४२-०), ओडिशा (२०८७-१), गुजरात (११८९-१) आणि महाराष्ट्राचा (११८८-२३) क्रमांक त्यानंतर आहे. मात्र मृत्यूबाबत राज्य आघाडीवर आहे. केरळ तसेच कर्नाटकपेक्षा रुग्णांची संख्या निम्म्याहून कमी असूनही राज्यात डेंग्यूने २३ जणांचा बळी घेतला आहे. गेल्या वर्षी राज्यात डेंग्यूचे २९३१ रुग्ण होते. त्यातील ५९ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत आगस्टपर्यंत डेंग्यूचे ४१० रुग्ण आढळले. या आजारामुळे चौघांना प्राण गमावावा लागला असून त्यातील तीन मृत्यू हे गेल्या महिन्याभरातील व गोरेगाव-अंधेरी परिसरातील आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात पालिका रुग्णालयात ३८ रुग्ण डेंग्यूवर उपचार घेत होते.
डेंग्यू हा विषाणुजन्य आजार असून स्वच्छ पाण्यात पैदास होत असलेल्या डासांमुळे तो पसरतो. दिल्ली, पंजाब, गुजरात, ओडिशा तसेच दक्षिण भारतात या आजाराचा अधिक फैलाव आहे. १९९७ ते २००२ दरम्यान या आजाराचे प्रमाण कमी झाले होते. मात्र त्यानंतर त्याचा प्रसार पुन्हा वाढला. गेल्या वर्षी देशात डेंग्यूचे पन्नास हजाराहून अधिक रुग्ण आढळले होते. त्यातील २४२ जणांचा मृत्यू झाला होता.

Story img Loader