मुंबई : राज्यातील गोरगरीब रुग्णांना सर्दी, खोकला व ताप आदी छोट्या आजारांसाठी बाह्यरुग्णसेवा मोफत उपलब्ध व्हावी या संकल्पनेतून आरोग्य विभागाने सुरु केलेल्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात गेल्या वर्षभरात ४२ लाख ४० हजार ७८० लोकांना बाह्यरुग्णसेवा देण्यात आली तर सुमारे पाच लाख रुग्णांची मोफत प्रयोगशाळा चाचणी आणि ६८ हजार ३७२ गर्भवती महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
तत्कालीन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना मांडण्यात आली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर या योजनेला वेग देताना मुंबईत मोठ्या प्रमाणात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात आले तर ग्रामीण भागासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून ७०० दवाखाने सुरु करण्यास मान्यता देण्यात आली होती. यापैकी ४२८ दवाखाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरु करण्यात आले असून यात १ मे २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधित तब्बल ४२ लाख ४० हजार ७८० लोकांची बाह्यरुग्ण तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. याशिवाय आवश्यकतेनुसार चार लाख ९७ हजार लोकांची प्रयोगशाळा चाचणी करण्यात आली.
शहरी भागात झोपडपट्टी तसेच ग्रामीण भागात फॅमीली डॉक्टर ही संकल्पना जवळपास संपुष्टात आली आहे. अशावेळी सर्दी, तापआदी छोट्या आजारांसाठी डॉक्टर मिळणे कठीण होत असल्याचे लक्षात घेऊन तत्कालीन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना असावा अशी भूमिका घेत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना मांडली. या योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर आरोग्य विभागाच्या माध्यमातून ४२८ दवाखाने सुरु करण्यात आले. एकूण ७०० दवाखान्यांपैकी उर्वरित २७२ दवाखाने लवकरच सुरु करण्यात येणार असून त्यापैकी ४४ दवाखाने हे आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरु केले जातील तर २२८ दवाखाने हे बाह्यस्त्रोत यंत्रणेच्या माध्यमातून चालवले जातील, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यासाठी २०२४-२५ साठी ३७८ कोटी रुपयांच्या खर्चाला शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. या दवाखान्यांमध्ये एक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सहाय्यक तसेच शिपाई असे मनुष्यबळ देण्यात आले आहे.
राज्यात आरोग्य विभागाची एकूण आठ परिमंडळे असून ठाणे परिमंडळात १७३ ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांना मंजुरी देण्यात आली असून सध्या सुरु असलेल्या ७८ दवाखान्यांमध्ये गेल्या वर्षभरात सुमारे सहा लाखांहून अधिक लोकांनी बाह्यरुग्णसेवा घेतली. पुणे परिमंडळात १४१ दवाखाने मंजूर असून यापैकी सध्या सुरु असलेल्या ४६ दवाखान्यांमध्ये साडेपाच लाख रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. नाशिक येथे १०४ दवाखाने मंजूर असून त्यापैकी ८८ दवाखान्यांमध्ये सव्वापाच लाख रुग्णांनी उपचार घेतले तर कोल्हापूर येथील ३४ दवाखान्यांमध्ये पावणेतीन लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील ३४ दवाखान्यांमध्ये तीन लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार झाले तर लातूर परिमंडळातील ४२ दवाखान्यांमध्ये सात लाख ६८ हजार रुग्णांनी बाह्यरुग्णोपचार घेतले. अकोला परिमंडळातील ५१ दवाखान्यांमध्ये सहा लाख तर नागपूर परिमंडळातील ५५ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात पाच लाख ८७ हजार लोकांनी बाह्यरुग्णोपचार घेतल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले. या दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता आगामी काळात लवकारत लवकर उर्वरित २२८ दवाखाने सुरु केले जातील असेही सूत्रांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मुंबईत एकूण २५० बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केले असून या दवाखान्यांमध्ये तब्बल ९४ लाख लोकांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले. याशिवाय मोठ्या प्रमाणात रक्त तपासणी व प्रयोगशाळा चाचण्यात करण्यात आल्याचे पालिकेच्या डॉक्टरांनी सांगितले.