संदीप आचार्य, लोकसत्ता
मुंबई : आरोग्य विभागाच्या माध्यमातून राज्यात आणखी ७०० बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला असून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या ३२२ ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ मध्ये अवघ्या महिनाभरात सव्वा दोन लाख रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सामान्य आजारांसाठीची रुग्णांची गरज लक्षात घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात आले असून आगामी काळात राज्यातील शहरी व निमशहरी भागांसाठी आणखी दवाखाने सुरु करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
देशात स्वातंत्र्योत्तर कालखंडात त्रिस्तरीय आरोग्यसेवा सुरु करण्यात आली होती. यात ग्रामीण भागासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र , ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय अशी व्यवस्था करण्यात आली होती. आता वाढत्या शहरीकरणाचा व विस्तारित शहरांचा विचार करता गोरगरीब रुग्णांना सामान्य आजारांसाठी तात्काळ आरोग्य तपासणी व उपचाराची सुविधा मिळणे ही मोठी गरज निर्माण झाल्याने आरोग्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही संकल्पना मांडली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने पहिल्या टप्प्यात दोनशे दवाखान्यांना मान्यता दिली होती. करोनाकाळामुळे यातील फारच थोडे दवाखाने तेव्हा प्रत्यक्षात सुरू होऊ शकले. मात्र मुख्यमंत्री बनल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेला युद्धपातळीवर गती देण्याचा निर्णय घेतला.
यातूनच मुंबई महापालिकेने तब्बल १६२ ‘आपला दवाखाना’ सुरु केले असून आजपर्यंत साडेसात लाखाहून अधिक रुग्णांची या दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आली आहेत. मुंबईत एकूण दोनशे दवाखाने उभारण्यात येेणार असून आरोग्य विभागानेही राज्यात तालुकानिहाय आपला दवाखाना सुरु करण्यासाठी कंबर कसली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पहिल्या टप्प्यात राज्यात ५०० ‘आपला दवाखाना’ उभारण्याचा सादर केलेल्या आराखड्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मान्यता दिली. यानंतर आरोग्य विभागाने राज्यात परिमंडळ निहाय दवाखान्याची जागा शोधण्यापासून डॉक्टरांच्या नियुक्तीपर्यंतची सर्व तयारी केली व १ मे पासून ३२२ दवाखाने सुरु करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्या हस्ते या दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले होते. तेव्हापासून २७ जूनपर्यंत २,२५,०३८ रुग्णांवर उपचार करण्यात आले तर ३१,६९२ रुग्णांच्या विविध चाचण्या करण्यात आल्याचे आरोग्य संचालक डॉ. लाळे यांनी सांगितले.
यात ठाणे परिमंडळात २९ आपला दवाखाना असून पुणे परिमंडळ ३०, नाशिक परिमंडळ ५२, कोल्हापूर २७, छत्रपती संभाजीनगर परिमंडळ २८,लातूर परिमंडळ ४५,अकोला परिमंडळ ५४ आणि नागपूर परिमंडळात ५७ असे ३२२ आपला दवाखाना सुरु करण्यात आले आहेत. रात्री दहापर्यंत या दवाखान्यांमध्ये रुग्ण तपासणी होते तसेच मोफत औषधोपचार केले जातात. तसेच गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी, लसीकरण, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, मानसिक आरोग्य विषयक समुपदेशन तसेच आवश्यकतेनुसार विशेषज्ञांच्या संदर्भ सेवा सल्ला उपलब्ध करून देण्यात येते.
राज्यात तालुकानिहाय किमान एक दवाखाना सुरु करण्याचा मानस सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता. तथापि सामान्य उपचारासाठी शहरी व निमशहरी भागातील लोकसंख्येचा विचार करून नव्याने ७०० दवाखान्यांना मंजुरी देण्यात आली असून याचा फायदा मोठ्या प्रमाणात गोरगरीब रुग्णांना होणार आहे. याशिवाय या दवाखान्यांत मधुमेह व उच्च रक्तदाब चाचणी करण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रामाणात याबाबत जनजागृती करता येऊन या दोन्ही आजारांना नियंत्रणात ठवण्याचा प्रयत्नही केला जाणार असल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी सांगितले.