मुंबई : राज्यातील कुष्ठरोग निर्मूलनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नवनर्षात ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत प्रत्यक्ष घरोघर जाऊन कुष्ठरोग व क्षयरोग शोध अभियान राबविण्यात येणार असून, ग्रामीण व निवडक शहरी भागातील सुमारे ८ कोटी ६६ लाख २५ हजार नागरिकांचे सर्वेक्षण या कालावधीत करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. मागील काही वर्षापासून आरोग्य विभागाने कुष्ठरोग निर्मूलनासाठी सातत्यपूर्ण केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील कुष्ठरुग्णांच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. २०२३-२४ मध्ये दर हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण १.१६ इतके होते ते २०२४-२५ मध्ये म्हणजे सप्टेंबर २०२४ अखेरीस १.०७ इतके झाले आहे. हे प्रमाण आणखी कमी करण्याचा निर्धार आरोग्य विभागाने केला आहे.
हेही वाचा >>> वायुप्रदूषण नियंत्रणात येईपर्यंत बांधकामावरील निर्बंध कायम, भायखळा परिसराच्या पाहणीअंती भूषण गगराणी यांची स्पष्टोक्ती
सार्वजनिक आरोग्य विभागाची कुष्ठरोग शोध अभियानासाठीची राज्य माध्यम जनजागृती समितीची बैठक नुकतीच पार पडली. आरोग्य सेवा आयुक्त अमगोथु रंगा नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीला आरोग्यसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. संदीप सांगळे, सहसंचालक, राज्य क्षयरोग व कुष्ठरोग, डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, डॉ. रामजी अडकेकर, सहाय्यक संचालक, कुष्ठरोग, डॉ. संजयकुमार जठार, सहाय्यक संचालक, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, डॉ. दिगंबर कानगुले, सहाय्यक संचालक, डॉ. नितीन भालेराव, सहाय्यक संचालक, बॉम्बे लेप्रसी प्रोजेक्टचे संचालक डॉ. विवेक पै आदी बैठकीला उपस्थित होते.
राज्यातील सर्व ग्रामीण व निवडक शहरी भागात कुष्ठरोग सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी ७०,७६८ शोध पथके तयार कऱण्यात येणार असून, १ कोटी ७३ लाख घरांना भेटी देऊन कुष्ठरोग व क्षयरोगाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३० जानेवारी हा कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात येतो.या दिवशी कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्रासाठी शपथ देण्यात येणार आहे. या निमित्ताने ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान कुष्ठरोग तसेच क्षयरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. जनजागृती व लोकसहभागासाठी राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कुष्ठरोगाविषयी व्यापक लोकजागृती करण्यासाठी २६ जानेवारी रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>> कुंभमेळ्याला गेलेल्या प्रवाशांना कर्मचाऱ्यांच्या जॅकेटवरून मिळणार रेल्वेचे तिकीट
आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध पातळ्यांवर कुष्ठरोग निर्मूलनासाठी होणाऱ्या प्रयत्नांमधून तसेच कुष्ठरुग्णांना करण्यात येणाऱ्या सातत्यपूर्ण औषधोपचारामुळे राज्यातील कुष्ठरुग्णांच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. २०२३-२४ मध्ये दर हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण १.१६ इतके होते ते २०२४-२५ मध्ये म्हणजे सप्टेंबर २०२४ अखेरीस १.०७ इतके झाले आहे. कुष्ठरोग निर्मूलनासाठी विविध पातळ्यांवर आग्रही प्रयत्न होत असले तरीही समाजामध्ये या आजारासंदर्भात असलेली भिती, गैरसमज यामुळे हा आजार आजही संपुष्टात आलेला नाही. करोना संसर्गानंतर या रुग्णसंख्येमध्ये थोडी वाढ झाली होती. मात्र करोना संपताच आरोग्य विभागाने रुग्ण शोधण्याची व्यपक मोहीम हाती घेतली. जास्तीतजास्त रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यामुळे कुष्ठरुग्णांचे प्रमाण कमी झाल्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ नितीन अंबाडेकर यांनी सांगितले.
आरोग्यसेवा( कुष्ठरोग आणि क्षयरोग) विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार २०२१-२२ मध्ये १४,५२० कुष्ठरुग्ण आढळून आले. २०२२-२३ मध्ये यात वाढ होऊन १९,८६० कुष्ठरुग्णांच्या नोंदी करण्यात आल्या असून २०२३-२४ च्या डिसेंबरपर्यंतच्या शोध मोहीमेत २० हजार कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत. जास्तीत जास्त नवीन रुग्ण शोधण्याबरोबरच प्राथमिक अवस्थेमधील रुग्ण शोधून वेळेत उपचार केल्यामुळे कुष्ठरुग्णांचे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे. परिणामी नवीन कुष्ठरुग्णांमध्ये लहान मुलांचेही प्रमाण कमी झाले आहे. रायगड,पालघर,धुळे, नंदुरबार,जळगाव, नाशिक, धाराशीव, अमरावती, यवतमाळ, भंडरा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा येथे दर दहा हजारी एकापेक्षा जास्त कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत तर नवीन शोधलेल्या कुष्ठरुग्णांचे प्रमाण दर एक लाख लोकांमागे १० पेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये रायगड, पालघर, धुळे, नंदुरबाहर, जळगाव, नाशिक,सातारा, परभणी, हिंगोली, धाराशीव, नांदेड, वाशीम, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा यांचा समावेश आहे. रुग्णांनी नियमितपणे औषधोपचार घेतल्यास हा आजार निश्चितपणे बरा होत असल्यामुळे उपचारासाठी आरोग्य विभागाकडून सातत्यापूर्ण प्रयत्न केले जात आहेत.कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र हे आरोग्य विभागाचे उद्दिष्ट असून यासाठी रुग्णशोध मोहीम घरोघरी जाऊन राबविण्याबरोबरच उपचारामुळे हा आजार बरा होऊ शकतो, असे डॉ अंबाडेकर यांनी सांगितले.