संदीप आचार्य, लोकसत्ता
मुंबई : राज्यातील महामार्गांवर तसेच समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने नवीन १७ ट्रॉमा केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे समृद्ध महामार्गावर ७१ रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. तर मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर २१ रुग्णवाहिका तैनात केल्या जाणार आहेत. गेल्या वर्षभरात राज्यातील विविध महामार्गांवर एकूण ३३,०६९ अपघात झाले असून यात १४,८३३ लोकांचा मृ्त्यू झाला तर २७,२१८ जण जखमी झाले आहेत.
महामार्गांवरील वाढत्या अपघातांच्या घटना लक्षात घेऊन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच नागपूर येथे संबंधितांची एक बैठक पार पडली. या बैठकीत अपघातातील जखमींना पहिल्या एक तासाच्या `सुवर्ण काळाʼत (गोल्डन अवर) मदत मिळण्याच्या दृष्टीकोनातून १७ ठिकाणी नवीन ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याचा तसेच समृद्धी महामार्गालगत ७१ रुग्णवाहिका तैनात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर २१ रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहेत. सद्यःस्थितीत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत एमएसआरडीसीचे खोपोली जवळ ३० खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर अस्तित्वात आहे. आरोग्य विभागाने २०१९ मध्ये राज्यातील विविध महामार्गांलगत १०८ ट्रॉमा केअर सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत ६३ ट्रॉमा केअर सेंटर सुरू केली आहेत. याव्यतिरिक्त १७ ट्रॉमा केअर सेंटर बांधून तयार ती कार्यान्वित करण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य आयुक्तांनी शासनाला सादर केला आहे.
महामार्गांवरील अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयीन पूर्व व रुग्णालयीन वैद्यकीय सेवा अपघाताच्या पहिल्या तासात मिळाल्यास मोठ्या प्रमाणात रुग्णांचे जीव वाचू शकतात. हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या १०८ क्रमांकांच्या रुग्णवाहिकेत आवश्यक असलेली वैद्यकीय सेवा तैनात करण्यात आली आहे. प्रामुख्याने गेल्या नऊ महिन्यांमध्ये एकट्या समृद्धी महामार्गावर १,२८२ अपघातांच्या घटना घडल्या असून यात १३५ जणांचे मृत्यू झाले. तर हजाराहून अधिक जण जखमी झाले होते. ही बाब लक्षात घेऊन समृद्धी महामार्गावर ७१ रुग्णवाहिका तैनात ठेवण्याचा निर्णय घण्यात आला आहे. या रुग्णवाहिकांमध्ये ५० रुग्णवाहिका या आरोग्य विभागाच्या असतील तर २१ रुग्णवाहिका या एमअसआरडीसी तैनात करणार आहे. याशिवाय मुंबई-पुणे महामार्गावर २१ रुग्णवाहिका ठेवण्यात येणार असून त्यात आरोग्य विभागाच्या पाच, तर १६ रुग्णवाहिका एमएसआरडीसी तैनात करणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आरोग्य विभागाकडून ट्रॉमा सेंटर उभारण्यात येत असून यासाठीचे निकष जे. जे. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता तसेच एच. एन. रिलायन्सचे माजी प्रमुख डॉ. गुस्ताद डावर यांच्या अध्यक्षतेखीली नऊ तज्ज्ञांच्या समितीने तयार केले आहेत. समितीने आपल्या शिफारशी २०१९ मध्ये सादर केल्या होत्या. मात्र आज अस्तित्वात असेलल्या अनेक ट्रॉमा सेंटरमध्ये समितीच्या शिफारशींची पूर्णत: अंमलबजावणी झाली नसल्याचेही आरोग्यमंत्र्यांकडील बैठकीत निदर्शनास आले. त्यामुळे आवश्यक डॉक्टर व कर्मचारी वर्गासह ज्या त्रुटी वा कमतरता आहेत त्याची पूर्तता करण्यास आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा >>> राज्यामध्ये करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; चार आठवड्यांत चारपटीने रुग्ण वाढले
राज्यात २०२१-२२ मध्ये एकूण २९,४७७ रस्ते अपघात झाले होते. यात १३,५२८ लोकांचे मृत्यू झाले तर २३.०७१ जण जखमी झाले होते. २०२२-२३ मध्ये राज्यातील रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ होऊन ३३,०६९ अपघातांची नोंद जाली असून यात १४,८८३ लोकांचे मृत्यू झाले तर २७,२१८ जण जखमी झाले होते. मुंबईचा विचार केल्यास मुंबईत २०२२-२३ मध्ये १७७३ रस्ते अपघात झाले असून यात २७२ मत्यू व १,६२० लोक जखमी झाले होते. मागील काही वर्षातील वाढते रस्ते अपघात लक्षात घेऊन १७ नवीन ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येणार असून लवकरच उर्वरित ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. ह सर्व ट्रॉमा केअर सेंटर ही १०० खाटांच्या रुग्णालयाशी सलग्न असणार आहेत. दोन ट्रॉमा सेंटरमधील अंतर हे १०० ते २०० किलोमीटर एवढे असेल. यापूर्वी या सेंटरमध्ये मंजूर मनुष्यबळ १५ एवढे होते. त्यात वाढ करून आता ३३ एवढे करण्यात आले आहे. या रस्ते अपघातातील जखमींना वेळेत रुग्णालयात पोहोचवता यावे यासाठी सध्या ९२ रुग्णवाहिका तैनात केल्या जाणार असून राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन संबंधितांबरोबर चर्चा करून आवश्यकतेनुसार आणखी रुग्णवाहिकांची व्यवस्था केली जाईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या विद्यमान ६३ ट्रॉमा केअर सेंटरमध्ये २०२१-२२ मध्ये दोन लाख ३९ हजार ७३४ रुग्णांवर पहिल्या टप्प्यात उपचार करण्यात आली. एकूण २८,४५३ जखमींना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले असून १२,७२१ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. २०२२- २३ मध्ये चार लाख १७ हजार ८६९ रुग्णांवर पहिल्या टप्प्यात उपचार करण्यात आले तर ४६,०४४ जखमींना दाखल करून उपचार करण्यात आले. तसेच १६,९१० जखमींवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. वाढते रस्ताअपघात लक्षात घेऊन ट्रॉमा केअर सेंटर अधिकाधिक बळकट करणे व पुरेसे मनुष्यबळ देण्याला प्राधान्य दिले जाईल असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.