राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी रात्री ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना अस्वस्थ्य वाटू लागल्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धनंजय मुंडेंच्या प्रकृतीबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सकाळी साडेसातच्या सुमारास सविस्तर माहिती दिली आहे.
टोपे यांनी ट्विटरवरुन धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. “राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धंनजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. कामाचा ताण व प्रवास इत्यादीमुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. काल रात्री उशिरा मी त्यांची भेट घेऊन डॉक्टरांशी देखील सविस्तर चर्चा केली आहे,” असं टोपे यांनी ट्विट करुन सांगितलं आहे.
तसेच अन्य एका ट्विटमध्ये टोपे यांनी, “काही काळ आराम करून ते पुन्हा एकदा आधीच्याच उत्साहाने जनतेच्या सेवेत रूजू होतील,” असा विश्वासही व्यक्त केलाय. धनंजय मुंडे हे ४६ वर्षांचे असून कामाच्या दगदगीमुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिलीय.