अहमदनगर जिल्ह्य़ातील सामूहिक बलात्कार, नागपूरमधील तुरुंगातून कैद्यांचे पलायन, नागपूर शहरातील गेल्या काही दिवसांतील गंभीर गुन्हे यासह काही घटनांमुळे गृहविभाग व पोलिस प्रशासन सुस्तावल्याचे दिसू लागल्याने मुख्यमंत्री नाराज आहेत. पण विरोधकांकडून आरोपांच्या फैरी झडत असूनही सरकारने विधानसभेत चर्चा टाळल्याचे बोलले जात आहे. गृह खात्याच्या उच्चपदस्थांकडून व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा सखोल आढावा घेतला असून गृहखात्यावरील पकड मजबूत करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची झाडाझडती घेऊन काहींची उचलबांगडी करण्यात येईल, असे संकेत मिळत आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपूर शहरात गेल्या महिनाभरात अनेक गंभीर गुन्हे घडले असून महिला अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी विलंबाने कारवाई केली, आरोपींना मदत केली, अशी तक्रार शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनीच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नगरमध्ये सामूहिक बलात्काराचे घडलेले प्रकरण गंभीर आहे. कायद्याची जरब बसविण्यासाठी गुन्हे शाबीत होण्याचा दर वाढविण्याच्या घोषणा मुख्यमंत्री करीत असताना नागपूर तुरुंगातून पाच कैदी अधिकाऱ्यांशी संगनमत करुन पळाल्याने तर प्रशासनाच्या प्रतिष्ठेचे धिंडवडे निघाले आहेत.
या गुंडाकडे मोबाईल होते व त्यांनी सुरक्षारक्षकांच्या मदतीनेच पळ काढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरुन तुरुंग अधीक्षकांना निलंबित करण्यात आले.
गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने विरोधकांचे टीकास्त्र त्यांच्यावर असून या खात्यावर अजून त्यांची पकड बसलेली नाही आणि ते उद्योग, नगरविकासासाठी अधिक वेळ देतात, गृहखात्याकडे त्यांचे लक्ष नसल्याने स्वतंत्रपणे खात्याचे काम पाहणार गृहमंत्री हवा, अशीही चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झाली होती.
त्यातच गंभीर गुन्हे घडत असल्याने आणि पोलिसांचा हलगर्जीपणा दिसून येत असल्याने मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढत असून ते नाराज आहेत. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे पुढील आठवडय़ात किंवा अधिवेशनानंतर लगेच बदलीसत्रही होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अहमदनगर बलात्कार प्रकरणाचे विधान परिषदेत पडसाद
मुंबई : अहमदनगर जिल्ह्य़ातील नेवासे तालुक्यात घडलेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणाचे तीव्र पडसाद मंगळवारी विधान परिषदेत उमटले. त्यावर हे प्रकरण अत्यंत गंभीर असून त्यावर काय कारवाई केली याबाबत सरकारने निवेदन करावे, असे आदेश विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले.
प्रश्नोत्तराचा तास संपताच काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी स्थगन प्रस्तावच्या माध्यमातून हे गंभीर प्रकरण सभागृहात मांडले. गावात झालेल्या हरिनाम सप्ताहासाठी जमलेल्या वर्गणीचा हिशेब मागितला म्हणून लक्ष्मण घुले या सरपंचाने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने गावातील एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना ही काळीमा फासणारी आहे. अशाच प्रकारची घटना नागपूरमध्येही घडली असून महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंताजनक आहेत. त्यामुळे सभागृहातील आजचे सर्व कामकाज तहकूब करून याच मुद्दयावर चर्चा करावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनीही त्यास पाठिंबा दिला. त्यावर हे प्रकरण गंभीर असून सरकारने त्याबाबत सभागृहात निवेदन करावे असे निदेश सभापतींनी दिले.
गृहविभाग सुस्त, पोलिस निर्ढावले!
अहमदनगर जिल्ह्य़ातील सामूहिक बलात्कार, नागपूरमधील तुरुंगातून कैद्यांचे पलायन, नागपूर शहरातील गेल्या काही दिवसांतील गंभीर गुन्हे यासह
First published on: 01-04-2015 at 01:51 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra home department look in active