एनसीबीनं मुंबईत क्रूजवर छापा टाकून आर्यन खानसह एकूण ८ आरोपींना अटक केल्यापासून हे प्रकरण राज्यात गाजतंय. राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा खळबळजनक आरोप करत त्याविषयी तक्रार केली. यासंदर्भात आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खुलासा केला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात विचारणा केल्यानंतर त्यांनी यावर भूमिका मांडली आहे.

समीर वानखेडे यांच्या आरोपांमुळे राज्यातलं वातावरण तापलेलं असतानाच मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. त्यामुळे या संदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी यासंदर्भात विचारणा करताच गृहमंत्र्यांनी तशा कोणत्याही सूचना कुणाला दिल्या नसल्याचं सांगत समीर वानखेडेंचे आरोप फेटाळून लावले.

मला वाटत नाही की…

“मला वाटत नाही की मुंबई पोलिसांचे अधिकारी वॉच ठेवतात वगैरे. तशा कोणत्याही सूचना कुणालाही दिलेल्या नाहीत”, असं दिलीप वळसे पाटील यावेळी म्हणाले. तसेच, त्यांच्या आरोपांविषयी आपल्याला फार माहिती नाही, त्याची अतिरिक्त माहिती घेऊन मी त्यावर बोलेन, असं देखील वळसे पाटील यावेळी म्हणाले.

समीर वानखेडेंवर ठाकरे सरकारकडून पाळत? महाराष्ट्र पोलिसांचा होतोय गैरवापर?”

वानखेडेंची पोलीस महासंचालकांकडे तक्रार

वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची सोमवारी भेट घेतली व दोन पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार केली. वानखेडे यांच्यासह एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन हे देखील यावेळी उपस्थित होते. वानखेडे यांनी केलेल्या काही धक्कादायक दावे केले आहेत. काही लोक माझ्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत, असं वानखेडे यांनी जैन आणि पांडे यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोनजण वानखेडे यांच्यावर पाळत ठेवत त्यांच्या मागावर असल्याचे सीसीटीव्ही फुटेजही हाती लागल्याची माहिती देण्यात आली आहे. हे प्रकरण फार गंभीर आहे असं सांगत वानखेडे यांनी यावर थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.

वाचा सविस्तर : समीर वानखेडेंचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप; पोलीस महासंचालकांची भेट घेत केली तक्रार

पोलीस दलाची महत्त्वपूर्ण बैठक

दरम्यान, आज दुपारी पोलीस दलाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. “राज्यात वाढणारी गुन्हेगारी किंवा महिलांवरील अत्याचार याविषयी सूचना देण्याच्या दृष्टीने राज्यातल्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना बोलावलं आहे. दुपारी २ ते ५ ही मीटिंग असेल. यात पोलीस दल अधिक प्रभावी कसा करता येईल, यासाठी विचार करण्यात येईल”, असं गृहमंत्री यावेळी म्हणाले.

Story img Loader