जादूटोणा किंवा अंधश्रद्धाविरोधी कायदा मंजूर करावा म्हणून गेली १८ वर्षे लढा देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रयत्नांना त्यांच्या मृत्यूनंतर अखेर यश मिळाले. जादूटोण्यासारख्या अनिष्ट प्रथा, रीतींना वचक बसवणाऱ्या जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी वटहुकूम काढण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. दाभोलकरांच्या मृत्यूनंतर उसळलेला जनक्षोभ आणि अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांचा आक्रोश यांमुळे दबावाखाली आलेल्या राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी अवघ्या दोन तासांच्या बैठकीत हा निर्णय घेतला. मात्र, महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा उंचावणारा हा कायदा अस्तित्वात येण्यासाठी डॉ. दाभोलकरांसारख्या विचारवंताचे रक्त सांडावे लागले, ही चुटपुट समाजाला कायमची लागून राहील.
कधी विरोधी पक्षांचा विरोध तर कधी सत्ताधारी पक्षांतील मतभेद, कधी सामाजिक संघटनांचा आक्षेप अशी कारणे पुढे करत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पुढे पुढे ढकलण्यात येत होते. मात्र, दाभोलकरांच्या मृत्यूनंतर या कायद्याविषयीचा आग्रह अधिक वाढला. डॉ. दाभोलकर यांना श्रद्धांजली म्हणून जादूटोणाविरोधी कायदा तात्काळ मंजूर करावा अशी मागणी पुढे आली होती. मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत छगन भुजबळ यांनी हा विषय उपस्थित केला. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ही योग्य वेळ आहे आणि त्याला विलंब लावल्यास चुकीचा संदेश जाईल, असा मंत्रिमंडळात मतप्रवाह होता. त्यानुसार याबाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या कायद्याचा मसुदा गुरुवारी राज्यपालांच्या स्वाक्षरीकरिता राजभवनवर पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर एक-दोन दिवसांत वटहुकूम निघण्याची शक्यता आहे.
अंधश्रद्धेला वचक
अघोरी प्रथा करणे, गुप्तधनासाठी बळी देणे, अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवणे, चेटूक काढण्याच्या नावाखाली दुष्कृत्य करणे यांना प्रतिबंध.
शिक्षा
सहा महिने ते सात वर्षांपर्यंत कारावास आणि ५० हजार दंड.
खुनी मोकाट
नरेंद्र दाभोलकर यांची निर्घृण हत्या करून पसार झालेले खुनी मोकाटच आहेत. पोलिसांनी संशयितांची रेखाचित्रे जारी करूनही अद्याप कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाही. घटनास्थळानजीकच्या सीसीटीव्हीवरून मिळालेले चित्रीकरणही अस्पष्ट असल्याने पोलिसांच्या अडचणींत वाढ झाली आहे. दरम्यान, पुणे पोलिसांच्या शहर गुन्हे अन्वेषण शाखेची दोन पथके मारेकऱ्यांच्या तपासासाठी शहराबाहेर रवाना झाली आहेत. तर मुंबई पोलिसही रेखाचित्रावरून आरोपींच्या शोधार्थ तांत्रिक बाजूंचा तपास करणार आहेत. दाभोलकरांना आलेल्या भ्रमणध्वनींवरून आरोपींचा माग काढण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. दाभोलकरांच्या हत्या हे अतिशय संवेदनशील प्रकरण असून त्याचा तपास जलदगतीने व्हावा यासाठी पुणे पोलिसांना सहकार्य करण्यासाठी जात असल्याचे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader