रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी ‘मराठी बाणा’ दाखवताच धास्तावलेल्या हॉटेल व्यावसायिकांनी मुंबईसह राज्यातील सर्व हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये मराठी पदार्थ मिळण्याची व्यवस्था करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता सर्व हॉटेल्समध्ये साऊथ इंडियन, पंजाबी डिशेस, चायनीजबरोबरच मेनू कार्डमध्ये मराठी पदार्थाचा स्वंतत्र उल्लेख असेल आणि त्यानुसार खमंग कांदाभजी, कांदेपोहे, बटाटा वडा, साबुदाणा वडा, मिसळ-पाव, पुरणपोळी यांचा स्वाद घेता येणार आहे.
हॉटेल्समधून मराठी पदार्थ मिळाले पाहिजेत, अशी मागणी गेल्याच आठवडय़ात आठवले यांनी केली होती. परंतु त्याची फारशी कुणी दखल घेतली नाही. त्यानंतर त्यांनी मराठी पदार्थ न ठेवणाऱ्या हॉटेल्सच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी त्यांनी आठवडय़ाभराची मुदत दिली होती. आज ऑल इंडिया हॉटेल्स अॅंड रेस्टारंट असोसिएशनचे अध्यक्ष आदर्श शेट्टी, तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी बुधवारी आठवले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मुंबईसह राज्यातील सर्व हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये मराठी पदार्थ उपलब्ध करुन दिले जातील, अशी ग्वाही त्यांनी आठवले यांना दिली. पुढील आठवडय़ापासूनच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. शिवाय मेनू कार्डमध्ये मराठी पदार्थ म्हणून स्वंतत्र उल्लेख करण्यात येणार आहे. आठवले यांच्या मराठी बाण्याचा विजय झाला असून, आता सर्व हॉटेल्समधून खमंग व चमचमीत मराठी पदार्थ खायला मिळतील, अशी प्रतिक्रिया रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा