मुंबई : ‘तंत्रज्ञानदृष्ट्या अतिप्रगत १०० शहरे बनवण्याच्या’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अस्तित्वास आलेल्या ‘स्मार्ट सिटी मिशन’ मोहिमेला ३१ मार्च २०२५ नंतर मुदतवाढ देण्यात आली नसल्याने या मोहिमेला आता पूर्णविराम मिळाला. तिची सांगता झालेली असल्याने आता या योजनेचा जमाखर्च मांडणे आवश्यक ठरते.
गेली दहा वर्षे राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत १०० पैकी जेमतेम आठ शहरांतील १०० टक्के प्रकल्प पूर्णत्वाला गेल्याचे खुद्द केंद्र सरकार म्हणते. यात महाराष्ट्रातील पुण्याचा समावेश असला तरी, प्रत्यक्षात पुण्यातील प्रकल्पपूर्ती कागदोपत्री असल्याचेच दिसून येत आहे. महाराष्ट्रातील अन्य शहरांतील प्रकल्पपूर्तीचा टक्काही नव्वदीच्या घरात गेला असला तरी, ही यशाची टक्केवारी प्रत्यक्षात आढळते का?
या योजनेतील शहरांना इंटरनेटने सुसज्ज करून त्याचा नागरी सुविधांसाठी वापर करणे तसेच या शहरांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारणे, ही ‘स्मार्ट सिटी मिशन’मागील मूळ संकल्पना. मात्र, निधी मिळण्यातील अडचणी, ‘स्मार्ट’साठी निवडलेल्या शहरांतील मूलभूत सुविधांचा अभाव, शहरांची उदासीनता अशा विविध कारणांमुळे मूळ योजना मागे पडली आणि नंतर ती ‘स्मार्ट शहर’ मोहीम अस्तित्वात असलेल्या शहरांचा कायापालट करण्यापुरती मर्यादित राहिली. ही मोहीम २०२०मध्ये पूर्णत्वाला येणे अपेक्षित असताना तिला एकूण पाच वर्षांची मुदतवाढ मिळाली. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार या मोहिमेवर आतापर्यंत तब्बल एक लाख ६४ हजार कोटींहून अधिक रक्कम खर्च झाली आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहारमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२५पर्यंत या शहरांतील ७४०० प्रकल्प पूर्णत्वाला आले. यापुढे या मोहिमेअंतर्गत उरलेल्या प्रकल्पांना ‘स्मार्ट सिटी मिशन’ऐवजी अन्य योजनांच्या माध्यमातून निधीपुरवठा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

या मोहिमेत महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरांचा समावेश होता. शासकीय आकडेवारीनुसार नागपूरचा अपवाद वगळता या मोहिमेंतर्गत अन्य शहरांतील ९० टक्क्यांपेक्षा अधिक कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, या प्रकल्पांमुळे तेथील नागरिकांचे जीवन सुसह्य झाले का, हा प्रश्न कायम आहे. पुण्यात गेल्या वर्षी अचानक निर्माण झालेली पूरस्थिती, ठाणे शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न, कल्याण-डोंबिवली शहरांतील अनधिकृत बांधकामे आणि वाहतूक कोंडी, अन्य शहरांतील वाहतूक व्यवस्थापनातील अडथळे इत्यादी घटक या शहरांच्या ‘स्मार्ट’ या बिरुदालाच आव्हान निर्माण करत आहेत. यातील जवळपास सर्वच शहरांनी केवळ रंगरंगोटी, रस्त्यांची कामे, सीसीटीव्ही यावर निधी खर्च केल्याचे दिसून आले. त्यामुळे ही शहरे ‘स्मार्ट’ बनली का, असा प्रश्न कायम आहे. वाहतुकीचा पर्यावरणपूरक पर्याय म्हणून सायकल मार्गिकेची योजना जवळपास सर्वच शहरांत राबवण्यात आली असली तरी सुरक्षित मार्गिकांअभावी त्याबाबतचा प्रतिसादही थंडा दिसतो.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra how many cities became smart under smart city mission of central government ended on 31st march 2025 css