मुंबई: महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावरून दोन्ही राज्यांमध्ये निर्माण झालेल्या कटुतेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आयोजित केलेल्या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे उपस्थित राहणार आहेत.दोन आठवडय़ांपूर्वी सीमा प्रश्नावरून हिंसक प्रतिक्रिया उमटली होती. सीमा भागात राज्याच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती. त्याची राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोट, जतसह काही भागांवर दावा केला होता. त्यावरून राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुरापती काढत असताना शिंदे -फडणवीस सरकारने कोणतीही आक्रमक भूमिका घेतली नाही, असा आरोप करीत विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आक्रमक रूप धारण करीत मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह राज्यातला सरकारला लक्ष्य केले. मुख्यमंत्री बोम्मई आक्रमक विधाने करीत असताना शिंदे-फडणवीस सरकार इतके थंड कसे, असा सवाल विरोधी पक्ष करीत होते. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्नाटकात भाजप तर राज्यातील सरकारमध्ये भाजप भागीदार असताना उभय राज्यांमध्ये हिंसाचार घडणे हे भाजपसाठी राजकीयदृष्टय़ा अडचणीचे ठरत आहे. यातूनच गृहमंत्री शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविली आहे. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत.

‘बैठकीत भूमिका स्पष्ट करू’अमित शहा यांनी बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आपण कर्नाटकची भूमिका स्पष्ट करू, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी सांगितले. बोम्मई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सीमावादावर चर्चेसाठी बोलावले आहे. या बैठकीत आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. राज्य पुनर्रचना कायदा लागू झाल्यानंतर आतापर्यंत म्हणजे सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यापर्यंतच्या घडलेल्या घडामोडींची तपशीलवार माहिती यावेळी देण्यात येईल.

महाराष्ट्राच्या सीमेवर गुजरातची घुसखोरी?
डहाणू/पालघर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद तापला असताना पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात वेवजीप्रमाणेच झाई गावात गुजरात राज्याने ३० वर्षांपूर्वी घुसखोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील ग्रामपंचायतीने झाईतील ३६ पैकी ३४ कुटुंबांना तीन लाख रुपये आणि घरपट्टीचे प्रलोभन दाखवून गुजरातेत समाविष्ट करवून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित दोन कुटुंबांनी त्यास नकार दिल्याने गुजरातमधील सरकारी यंत्रणांनी कारवाईच्या नोटिसा पाठवल्याने खळबळ उडाली आहे. तलासरी तालुक्यातील झाई गावापासून गुजरातमधील उंबरगाव तालुक्यातील गोवाडा ग्रामपंचायतीची हद्द १५० ते २०० मीटर अंतरावर आहे. या दोन गावांमध्ये एक पूल आहे. मात्र, सीमादर्शक दगड खाजन जमिनीतील चिखलात गाडला गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra karnataka chief ministers of both the states discussed with amit shah amy