राज्यातील नेत्यांकडून जय्यत तयारी

मुंबई : इंडिया आघाडीची बैठक  येत्या गुरुवार, शुक्रवारी मुंबईत होत आहे.   बैठकीचे सारे यजमानपद शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे असून, संयुक्त निवेदनाचा मसुदा तसेच प्रसिद्धी व राजशिष्टाचाराची जबाबदारी काँग्रेसवर सोपविण्यात आली आहे.  इंडियाच्या बैठकीचे यजमान हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘इंडिया’च्या मानचिन्हाचे गुरुवारी अनावरण; दोन दिवसांच्या बैठकीत समन्वयावर चर्चा

इंडियाचे मानचिन्ह, संयुक्त निवेदन हे सारे काँग्रेसकडून तयार केले जात आहे. बैठकीच्या अखेरीस संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात येईल. त्याची तयारी काँग्रेसने केली आहे. वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे आहे.  काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे, सोनिया गांधी तसेच राहुल गांधी हे बैठकीला उपस्थित राहणार असल्याने काँग्रेस नेत्यांनी सारी तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या कार्यकारी समितीत अलीकडेच समावेश झालेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे काँग्रेसच्या नियोजनाची जबाबदारी असेल.

हेही वाचा >>> Express Adda : गुंतवणूकदार रुचिर शर्मा यांची विशेष मुलाखत

पुरणपोळीचा बेत

गुरुवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी इंडियाच्या नेतेमंडळींसाठी स्नेहभोजन आयोजित केले आहे. यासाठी पुरणपोळी, भरली वांगी, श्रीखंड पुरीचा बेत करण्यात आला आहे. शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आस्वाद नेतेमंडळींना घेता येईल. ग्रँड हयातसह विमानतळाच्या आसपासच्या तीन ते चार हॉटेलांमध्ये नेतेमंडळींच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

काँग्रेसचे नेते, पदाधिकारी सक्रिय

मुंबई : येत्या गुरुवार आणि शुक्रवारी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या आघाडीच्या बैठकीची तयारी सुरू आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बैठकसत्र सुरू आहे. राज्यातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. 

 महाविकास आघाडीबरोबरच गेल्या चार-पाच दिवसांपासून काँग्रेस नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरू आहे. सोमवारी गरवारे क्लबवर अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. इंडियाच्या नेत्यांचे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणार आहे. त्या दृष्टीने सायंकाळी अशोक चव्हाण यांनी विमानतळावर जाऊन टी १, टी २ व गेट-८ च्या बाहेरील नियोजनाची पाहणी केली.

 देशातील प्रमुख नेते बैठकीसाठी येणार आहेत. त्यांना ज्या दर्जाची सुरक्षा आहे, त्याच दर्जाची सुरक्षाव्यवस्था दिली पाहिजे, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

‘व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपेक्षा भाजपविरोधात आघाडीवर भर’

पाटणा  :  विरोधकांची आघाडी उभारण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. आपल्याला कोणतीही व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. तसेच विरोधकांच्या इंडिया आघाडीचे निमंत्रक इतर कोणत्याही नेत्याला केले तरी आपल्याला आवडेल असे नितीशकुमार यांनी नमूद केले. विरोधकांच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीत नितीशकुमार यांना निमंत्रक केले जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्याबाबत विचारले असता मला व्यक्तिगत काही नको असे त्यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra leader preparation for two day india alliance meeting in mumbai zws
Show comments