विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच गोंधळ उडाला. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. ओबीसींचा इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने देण्यासाठी विधानसभेत ठराव मांडण्यात आला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हा ठराव मांडत असताना विरोधकांचा गोंधळ सुरु होता. गदारोळतच हा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी अध्यक्षांच्या दालनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार संजय कुटे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. यावर काँग्रेस प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाचा खरा चेहरा ओबीसीच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

“भाजपा ओबीसी समाजाबाबत चुकीचं सांगून समाजाची दिशाभूल करत होती. जेव्हा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ याबाबत बोलले. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा तोल सुटला. आता तर अध्यक्षांच्या दालनामध्ये जाऊन त्यांना धक्काबुक्की करण्यात आली,” असा आरोप काँग्रेस प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले म्हणाले, “आजच्या परिस्थितीमुळे ओबीसी आरक्षणाबाबत भाजपाचा द्वेष समोर आला आहे. भाजपाचा खरा चेहरा ओबीसीच्या विरोधात असल्याचे स्पष्ट झाले आहे.”

हेही वाचा- पावसाळी अधिवेशन : “ते आम्ही संसदेकडून शिकलोय”; फडणवीसांना अध्यक्षांचा टोला

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“कोणतीही धक्काबुक्की झालेली नाही. काही लोक, मंत्री जाणुनबुजून कामकाज काढून घेण्यासाठी आणि सभागृह चालू नये यासाठी गोष्टी तयार करत आहेत. परंतू त्यांनी काही केलं तरी आम्ही पुरुन उरलो आहोत. सर्वांसमोर त्यांचा बुरखा फाडणार आहे,” असं आव्हानच देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. तालिका सभापतींना कोणतीही धक्काबुक्की झालेली नाही. मी तिथे उपस्थित होतो असंही त्यांनी सांगितलं.

“राज्य सरकारने ओबीसीच्या डेटासंबंधी ठराव मांडून पुन्हा एकदा दिशाभूल केली आहे. मागासवर्ग आयोगाने इम्पेरिकल डेटा तयार करण्याचे आदेश दिला असताना जनगणनेचा डेटा पाहिजे असं सांगण्यात आलं. मी सुप्रीम कोर्टाचा आदेशही वाचून दाखवला आहे. १५ महिने या सरकारने आयोग स्थापन केलेला नाही. हा ठराव आणून वेळ मारुन न्यायची आणि केंद्राकडे बोट दाखवायचं असा प्रयत्न केला,” असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Story img Loader