मुंबई : राज्यसभेतील पराभव आणि भाजपने सहावा उमेदवार मागे घेतल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करावी, असा शिवसेना आणि राष्ट्रवादीत सूर असताना काँग्रेस दोन जागा लढण्यावर ठाम राहिल्याने निवडणूक अटळ ठरली आहे. त्यामुळे पुन्हा आमदारांचा ‘भाव’ वाढणार आहे. दहाव्या जागेसाठी आता भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत सोमवारी दुपापर्यंत होती. निवडणूक बिनविरोध व्हावी, या दृष्टीने महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चाही झाली होती. पाच जागा मिळणार असल्यास निवडणूक बिनविरोध करण्यास भाजपचीही तयारी होती. भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज दाखल केलेले सदाशिव खोत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. निवडणूक बिनविरोध व्हावी, असा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न होता. अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, अनिल परब, अनिल देसाई या महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे घ्यावा, असे सुचविण्यात आले. पण, दोन जागा लढण्यावर काँग्रेसने ठाम भूमिका घेतली. परिणामी निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही.

राज्यसभा निवडणुकीतील पराभवामुळे महाविकास आघाडीची  नाचक्की झाली. सहावी जागा लढविण्यासाठी पुरेशी मते आहेत का, यावर आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत खल झाला. काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांनी माघार घेण्यास ठाम नकार दिला. काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २६ मतांची आवश्यकता आहे. गुप्त मतदान असल्याने कोटय़ापेक्षा  दोन तरी अधिक मते पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना द्यावी लागतील. १६ अतिरिक्त मते काँग्रेसकडे असली तरी अन्य १० मतांची व्यवस्था करावी लागेल. शिवसेना व राष्ट्रवादीकडे अतिरिक्त मते शिल्लक नाहीत. याशिवाय दोन्ही पक्ष दुसऱ्या पसंतीची मते आपल्या दुसऱ्या उमेदवारांना देणार आहेत. यामुळेच बाहेरून दहा मते भाई जगताप यांना मिळवावी लागतील. एवढय़ा मतांची खात्री आहे का, असा सवाल आघाडीच्या बैठकीत करण्यात आला तेव्हा तेवढी मते नक्कीच मिळवून विजयी होऊ, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. भाजपला अतिरिक्त का जागा सोडायची, असा सवाल काँग्रेसने केला.

भाजपकडेही कमी मते 

भाजपला पाचवी जागा निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. पाच जागा निवडून आणण्यासाठी १३० मतांची आवश्यकता आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली. गुप्त मतदान पद्धतीमुळे बाहेरून तेवढी मते मिळू शकतात, असे भाजप नेत्यांचे गणित आहे. गुप्त मतदानामुळे राजकीय पक्षांची मतेही मिळण्याचा मार्ग मोकळा आहे. भाजपचे १०६ आमदार असून, आठ आमदारांचा पाठिंबा आहे. पक्षाला पाचव्या जागेसाठी १६ मतांची गरज असेल. काँग्रेसपेक्षा भाजपला अधिक मतांची आवश्यकता आहे. सहाही जागा निवडून आणू, असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेच्या विजयानंतर केला होता. पण, सहाव्या जागेचे गणित जमणे अशक्य असल्याने पक्षाने पाच अधिकृत उमदेवार रिंगणात ठेवून, पुरस्कृत केलेले सहावे उमेदवार सदा खोत यांचा अर्ज  मागे घेतला. 

जगताप विरुद्ध लाड दुसऱ्यांदा लढत

* विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात २०१६ मध्ये दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजप पुरस्कृत प्रसाद लाड यांच्यात चुरशीची लढत झाली होती. त्या लढतीत जगताप यांनी लाड यांना पराभूत केले होते.

* या वेळी दहाव्या जागेसाठी जगताप आणि लाड यांच्यात लढत होत असून, गेल्या निकालाची पुनरावृत्ती होते की लाड जुने हिशेब चुकते करतात, याची उत्सुकता असेल.

उमेदवार 

* रामराजे नाईक-निंबाळकर व एकनाथ खडसे (राष्ट्रवादी)

* विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड (भाजप)

* सचिन अहिर व आमशा पाडवी (शिवसेना)

* चंद्रकांत हंडोरे व भाई जगताप (काँग्रेस)

काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. त्यामुळेच पक्ष दोन जागा लढवीत असून, दोन्ही जागा जिंकू.

बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री व  काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते

Story img Loader